दिल्ली वार्ता : नड्डा यांचं ठरलंय!

– वंदना बर्वे
भाजप अध्यक्ष निवड मार्गातील 50 टक्क्यांची अडचण दूर झाली आहे. कदाचित म्हणूनच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा हिमाचल प्रदेशच्या राजकारणात आधीपेक्षा जास्त रस घेताना दिसताहेत.
मागील दोन वर्षांपासून रेंगाळलेला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुद्दा मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागले आहेत. भाजपच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यापूर्वी देशातील 50 टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड होणे आवश्यक आहे. मागील दहा दिवसांत भाजपने बर्याच प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. थोडक्यात, भाजपचा नवीन अध्यक्ष निवडण्याच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आता दूर झाली आहे. यामुळे लवकरच भाजपाध्यक्षाची निवड केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेशी दौर्यावर आहेत. 21 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल अशी चर्चा सध्या रंगली आहे. अध्यक्षाच्या नावावरून भाजप हायकमांड आणि संघात एकमत झाले असेल, तर अध्यक्षाच्या नावाची घोषणा व्हायला काहीच हरकत नाही. जे पी नड्डा यांचा कार्यकाळ 2023 मध्येच संपला होता. मात्र, लोकसभेची निवडणूक लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढविण्यात आला. ही मुदतसुद्धा आता संपली आहे. जानेवारी 2020 मध्ये अध्यक्ष झालेले नड्डा आता केवळ अध्यक्ष नाहीत तर केंद्रात मंत्रीसुद्धा आहेत.
खरं म्हणजे, भाजप हायकमांडलाही नवीन अध्यक्षाची निवड लवकरात लवकर करायची आहे असे दिसून येते. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत भाजपने तब्बल 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली. भाजपने आतापर्यंत 19 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षाची निवड केली आहे. हा आकडा 50 टक्क्यांची अट पूर्ण करणारा आहे. येथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, भाजपने अलीकडच्या काळात ज्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बनविले आहे ते सर्व लोप्रोफाइल आहेत. याचा अर्थ असा की, भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा प्रकाशझोतात राहण्यापेक्षा जमिनीवर काम करणारा असू शकतो. एकप्रकारे संघ आणि भाजपने पक्षातील नेत्यांना संदेश दिला आहे.
जे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात त्यांची पुरेपूर काळजी घेतली जाते. पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्या क्षमतेचा पक्षासाठी योग्य वापर करण्याची क्षमता असलेला असावा आणि त्यांच्या सन्मानाची पुरपूर काळजी घेणारा असावा, अशी संघाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, भाजप हायकमांडकडून पक्षात तिसरी शक्ती केंद्र निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. कदाचित याच कारणामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडीचा मुद्दा दोन वर्षांपासून रेंगाळत चालला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि शिवराजसिंग चौहान यांच्यासह डझनभर नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. ही सर्व मंडळी संघाच्या वर्गात तयार झाली आहेत.
आगामी काळात अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणे आहे. यंदा दोन-तीन महिन्यांनंतर बिहारमध्ये निवडणूक होणे आहे. 2026 मध्ये आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक होणे आहे. 2027 मध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये निवडणूक होणे आहे. गुजरात आणि उत्तरप्रदेशमधील विधानसभेची निवडणूक आणि 2029 मध्ये होणार्या लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे. आणखी विशेष म्हणजे, उत्तरप्रदेशातील प्रदेशाध्यक्षाची निवडणूक अद्याप झालेली नाही. यूपीचा अध्यक्ष निवडणे खूप नाजूक गोष्ट आहे. 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला होता. परंतु, भाजपचा अश्वमेध यूपीच्या चिखलात फसला. 2029 मध्ये याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊनच यूपीचा अध्यक्ष निवडावा लागणार आहे. आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आधी निवडला जातो की यूपीचा प्रदेशाध्यक्ष निवडला जातो, हे भाजपवर हायकमांडवर अवलंबून आहे.
एक मात्र नक्की की, जे पी नड्डा यांना स्वतःच्या एक्झिटची चाहुल लागली आहे. यामुळे त्यांनी आपले पुढचे टार्गेटसुद्धा ठरविले आहे. याबाबत सांगायचे झाले तर, अलीकडच्या काळात नड्डा यांनी हिमाचल प्रदेशचे दौरे वाढविले आहेत. 2027 मध्ये हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार आहे. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात 2022 मध्ये हिमाचलमध्ये निवडणूक झाली होती आणि त्यात भाजपचा पराभव झाला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर नाराजही झाले होते. एका कार्यक्रमात नड्डा यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तेव्हा हा पुष्पगुच्छ हिमाचलच्या पराभवासाठी आहे का, अशी कोपरखळी पंतप्रधानांनी मारली होती.
नड्डा यांना 2027 मध्ये या पराभवाचा हिशेब चुकता करायचा आहे. किंबहुना, हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची त्यांची इच्छा आहे. यामुळे त्यांनी हिमाचलच्या डोंगर दर्यांचे दौरे करायला सुरुवात केली आहे. या त्यांच्या दौर्यांची खूप चर्चा रंगली आहे. नड्डा यांचे वडील नारायण लाल नड्डा यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. यानंतर त्यांनी तिसर्यांदा प्रदेशाध्यक्ष झालेले डॉ. राजीव बिंदल यांच्यासह माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि शांता कुमार यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या.
प्रेमकुमार धुमल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात जे पी नड्डा कॅबिनेट मंत्री होते. नड्डा यांनी 15 वर्षांपूर्वी हिमाचलच्या राजकारणातून बाहेर पडत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता. आता ते परत हिमाचलच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. अलीकडच्या गाठीभेटीकडे 2027 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी म्हणून बघितले जात आहे. आता, जे पी नड्डा हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर बसणार की नाहीत? या प्रश्नाचे उत्तर भविष्यात दडलं आहे. मात्र, सध्या तरी सर्वांचे लक्ष भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कधी निवडला जाईल आणि तो कोण असेल? याकडे लागले आहे.





