प्रेमासाठी वाट्टेल ते! वय बसत नव्हते म्हणून मोठ्या बहीणीच्या आधारकार्डवर केले बॉयफ्रेंडसोबत लग्न; पितळ उघडे पडताच…

हिसार : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. या प्रेमासाठी प्रियकर आणि प्रेयसी काहीही करू शकतात. याचेच एक उदाहरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या मोठ्या बहीणीच्या आधारकार्डाचा वापर करत प्रियकराशी लग्न केले आहे. हे लग्न रजिस्टरदेखील केले. जेव्हा ते दोघे संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात पोहोचले तेव्हा त्यांचे पितळ उघडे पडले.
या दोघांनी 3 सप्टेंबरला रिवाज विवाह सेवा संस्थेमध्ये जाऊन लग्न केले होते. मात्र, तरुणीचे वय तेव्हा 16 वर्षे होते. यामुळे तिने आपल्या 21 वर्षीय मोठ्या बहिणीचे आधारकार्ड तिथे जमा केले. यानंतर त्यांनी रजिस्टर लग्न केले. प्रकरण तेव्हा उघड झाले जेव्हा या दोघांना त्यांच्या कुटुंबापासून धोका असल्याचे वाटू लागले. तरुणीने लग्न रजिस्टर करताना आपल्या बहीणीचेच नाव सांगितले. तसेच तिच्याच नावाची सहीदेखील मारली. 10 सप्टेंबरला त्या जोडप्याने सेशन कोर्टात सुरक्षा मागितली.
न्यायालयाने त्या दोघांना सुरक्षादेखील दिली. परंतू हे करताना मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे देखील नोंदविले जाते. इथेच खेळ उलटा पडला. मुलीच्या वडिलांनी दुसरेच नाव घेतले जे छोट्या मुलीचे होते. कोर्टात मोठ्या मुलीचे नाव नोंद होते. यामुळे ही मुलगी 16 वर्षांचीच असल्याचे उघड झाले. मुलीला याबाबत विचारले गेले तेव्हा तिच्या पती बनलेल्या बॉयफ्रेंडला तिचे वय माहिती नसल्याचे तिने सांगितले.
न्यायधीशांनी दिलेल्या निकालाच्या आधारे आता या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी फसवणूक करून लग्न केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असे आदेश न्यायालयाने दिले.





