विनेश फोगटच्या बाजूनेच समन्वयाचा अभाव होता; ज्येष्ठ वकिल हरिश साळवेंनी स्पष्ट केली भूमिका

दिल्ली – राजकारणात उतरलेली स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिच्याबाबत देशातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी मोठा दावा केला आहे. साळवे हे विनेशचे वकील होते. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. नंतर त्यांनी या निर्णयाविरुद्ध कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फार स्पोर्ट अर्थात कॅसमध्ये अपील केले होते.
विनेश फोगट 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची प्रबळ दावेदार होती. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयाकडे अर्थात कॅसकडे दाद मागितली होती. हरीश साळवे हे विनेशची केस लढत होते. मात्र, कॅसने विनेशची मागणी फेटाळली होती.
अलीकडेच विनेश म्हणाली होती की पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलपूर्वी, जेव्हा तिला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते, तेव्हा तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. पीटी उषाही फक्त फोटो काढण्यासाठी आल्याचे विनेशने सांगितले होते. विनेशने वकील हरीश साळवे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली होती.
साळवे यांनी कठोर भूमिका दाखवली नाही,असे ती म्हणाली होती, त्यानंतर आता आपली भूमिका मांडताना साळवे म्हणाले आम्ही विनेश फोगट यांच्याकडे सीएएसच्या निर्णयाला आव्हान देण्याची बाब व्यक्त केली होती, परंतु विनेशला या निर्णयाविरोधात स्विस कोर्टात जायचे नव्हते. मी तिला सांगितले होते की आम्ही या निर्णयाविरुद्ध स्विस कोर्टात जाऊ शकतो, पण तिला हे प्रकरण पुढे न्यायचे नसल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले.
विनेश फोगट यांच्या बाजूनेही समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप हरीश साळवे यांनी केला. सुरुवातीला खूप समन्वयाचा अभाव होता. विनेशच्या वकिलाने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या लॉ फर्मसोबत काहीही शेअर करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला सध्या काहीही देऊ शकत नाही, याकडेही साळवे यांनी लक्ष वेधले.





