सख्ख्या भावाच्या कुटुंबियांनीच वृद्धाला जीवंत जाळले; नाशिक जिल्ह्यातील हादरा देणारी घटना

नाशिक – जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेला अन् एका वृद्धाला सख्ख्या भावाच्या कुटुंबियांनीच डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली. थडी सारोळे गावातील 80 वर्षीय कचेश्वर नागरे यांचा यात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबियांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून केली जात आहे. मृताचे नातेवाईक हे पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरे बंधूंमध्ये शेतामधील वडिलोपार्जित विहिरीवरुन वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत होते. ते घरात एकटे होते. हीच संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले.
आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे जीव वाचवण्यासाठ सैरावैरा पळायला लागले. त्यांचा आवाज ऐकून कचेश्वर नागरे यांचे कुटुंबिय धावत बाहेर आले. तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब तिथून पसार झाले होते. यानंतर कचेश्वर नागरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 95 टक्के भाजल्यामुळे कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.





