IT Share : आयटी कंपन्यांचे शेअर कोसळले

नवी दिल्ली : अमेरिकेने एच-1 बी व्हिसाला 1 लाख डॉलर शुल्क लावल्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या आपल्या कर्मचार्यांना अमेरिकेत पाठवू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरवर अपेक्षेप्रमाणे सोमवारी नकारात्मक परिणाम झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 2.73 टक्क्यांनी कोसळून 34,988 अंकावर बंद झाला.
भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या 283 अब्ज डॉलरच्या सॉफ्टवेअरची निर्यात करतात. यासाठी काही महत्त्वाच्या कामासाठी या कंपन्यांना भारतीय मनुष्यबळ अमेरिकेत पाठवावे लागते. यासाठी एच-1 बी चा वापर केला जातो. मात्र यासाठी तब्बल 1 लाख डॉलर शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या कामावर लघु पल्ल्यात तरी परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअरची विक्री केली.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे फक्त नव्या व्हिसा अर्जासाठी हे शुल्क लावण्यात आले आहे. या अगोदर मंजूर केलेल्या व्हिसावर याचा परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे 2025 साठीची व्हिसा पुरवण्याची प्रक्रिया अगोदरच संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता फक्त 2026 मधील या संदर्भातील कामकाजावर परिणाम होणार आहे. तोपर्यंत अमेरिकेचे भारतासंदर्भातील धोरण कदाचित बदलू शकते. त्यामुळे लघु पल्ल्यात तरी दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेने व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली होती. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची अमेरिकेला निर्यात वाढण्याची शक्यता होती. यामुळे गेल्या आठवड्यात या क्षेत्राचे निर्देशांक वाढले होते. मात्र अचानक अमेरिकेने व्हिसा संदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम झाला.
मुख्य निर्देशांकात घट
या घडामोडीचा शेअर बाजाराच्या एकूणच कामकाजावर नकारात्मक परिणाम झाला. अशा परिस्थितीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 466 अंकांनी कोसळून 82,159 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 124 अंकांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी कोसळून 25,202 अंकावर बंद झाला. निर्देशांक जास्त कोसळले असते मात्र जीएसटी कर कपात करण्यात आल्यामुळे इतर क्षेत्रावर याचा जास्त परिणाम झाला नाही, असे विश्लेषकांनी सांगितले.





