Industry sectors : आयटी, उद्योगांना महागाईचा ‘शॉक’; हार्डडिस्कचे भाव दुपटीहून अधिक
Industry sectors : नऊ महिन्यांत ४ हजारांवरून १० हजारांवर झेप; एआय आणि डेटा सेंटरमुळे वाढत्या मागणी

संदीप घिसे
पिंपरी – संगणक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांत अनेक उपकरणांचे दर झपाट्याने वाढले आहेत. हार्डडिस्कच्या किमतीने तर थेट दुपटीहून अधिक उसळी घेतली आहे.
डिसेंबरमध्ये सुमारे चार हजार रुपयांना मिळणारी एक टीबी हार्डडिस्क आता दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एआय आणि डेटा सेंटरमधून वाढलेली मागणी हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, हिंजवडी आणि तळवडे परिसरातील संगणक व इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या बाजारपेठेत या दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. आयटी कंपन्या, कारखाने, कार्यालये आणि व्यावसायिकांना आता तांत्रिक साहित्य खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे नियोजित बजेटही विस्कटले आहे.
डेटा साठवण्यासाठी हार्डडिस्कचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. संगणक, सर्व्हर आणि इतर यंत्रणांमध्ये त्याची गरज असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये एक टीबी हार्डडिस्क सुमारे चार हजार रुपयांना उपलब्ध होती.
आता त्याच क्षमतेच्या हार्डडिस्कसाठी सुमारे दहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. पोर्टेबल हार्डडिस्कच्या किमतीतही वाढ झाली आहे. एसएसडीचे दरही वाढले आहेत.
एआयमुळे स्टोरेजची मागणी वाढली
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत आहे. एआयच्या वाढत्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा साठवावा लागतो. त्यासाठी डेटा सेंटरची उभारणी सुरू आहे. डेटा सेंटरकडून मोठ्या क्षमतेच्या स्टोरेज उपकरणांची मागणी वाढली आहे.
त्यामुळे उत्पादकांकडील उपलब्ध साठ्याचा मोठा हिस्सा या क्षेत्राकडे वळत आहे. परिणामी स्थानिक बाजारात काही उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यातील या फरकाचा परिणाम किमतीवर होत आहे.
केबल्सही २० ते २५ टक्क्यांनी महाग
इलेक्ट्रॉनिक उपकरणांबरोबरच विविध प्रकारच्या केबल्सचे दरही वाढले आहेत. लॅन केबल, ऑप्टिकल फायबर आणि इतर वायरिंग साहित्य महागले आहे. केबल निर्मितीसाठी पीव्हीसी, तांबे आणि इतर धातूंचा वापर होतो. या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. अनेक केबल्सच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
सीसीटीव्हीच्या दरातही वाढ
सुरक्षा यंत्रणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. प्रमाणीकरण आणि चाचणी प्रक्रियेमुळे उत्पादकांचा खर्च वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वी सुमारे १,८०० ते २,००० रुपयांना मिळणारा कॅमेरा आता २,५०० रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळत आहे. कार्यालये आणि कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या बायोमेट्रिक हजेरी यंत्रणांचे दरही वाढले आहेत. या उपकरणांच्या किमतीत साधारण १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.





