Ashok Kharat Nashik Crime News – स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असुन. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी थेट पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली सुरू असून, दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे दिला. नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अटक केली. पीडितेने खरातवर गेल्या तीन वर्षांत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. खरातच्या आश्रमात अनेक बडे राजकीय नेते आध्यात्मिक सल्ल्यासाठी जात असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. Ashok Kharat या पार्श्वभूमीवर नागपूर येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून ते नाशिक पोलिसांच्या समन्वयाने काम करत आहे. या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांना फटकारताना फडणवीस म्हणाले की, “अशा संवेदनशील विषयावर विनाकारण राजकारण करणे योग्य नाही. ज्यांच्याकडे या संदर्भात ठोस पुरावे आहेत, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे. तपासात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.” राहुल – ममतांवर निशाना.. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठे घुसखोर म्हणून टीका करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत आपला पराभव निश्चित असल्याचे दिसू लागल्यामुळे त्या आपला संयम गमावत आहेत. तसेच, देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधींनी केलेल्या ट्विटचा समाचार घेताना फडणवीस यांनी शेजारील देशांतील परिस्थितीचा दाखला दिला. पाकिस्तान आणि श्रीलंकेत इंधन टंचाई आणि अराजकता माजली असताना, केंद्र सरकारने जागतिक युद्धाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसू दिला नाही, असा दावा त्यांनी केला. राहुल गांधी केवळ देशाची बदनामी करून समाजात असंतोष पसरवण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.