Pimpri News | फुले दांपत्यास भारतरत्न मिळणे मागणी नाही तर, तो आपला हक्क – जयकुमार गोरे

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आली की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले या दांपत्यास भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागते. मात्र पुरस्कार मागण्यापेक्षा तो आपला अधिकार आणि हक्क आहे, असे प्रतिपादन ग्राम विकास, पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने नामदार गोरे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी सह आयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नामदे, लोकसेवा आयोग परीक्षेत यशस्वी झालेले आकाश गोरे, रोहन पिंगळे, विशाल पांढरे, गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त साखरचंद लोखंडे, शिवराज शिंदे यांच्यासह ७२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक वसंत लोंढे, भाऊसाहेब भोईर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर, माजी महापौर अपर्णा डोके, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, प्रशांत डोके, सीए सुहास गार्डी, अध्यक्ष हनुमंत माळी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी यावर्षीचा संत सावता भूषण पुरस्कार संतोष लोंढे यांना तर संत सावता कृषीरत्न पुरस्कार ह.भ.प. मुरलीधर भुजबळ व दिलीप विधाटे या प्रगतशील शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. तसेच संत सावता उद्योग रत्न पुरस्कार संजय जगताप यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्ष हनुमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. पौर्णिमा कोल्हे व ह.भ.प. महादेव भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. तर विश्वास राऊत यांनी आभार मानले.
सासरी जातांना मुलीच्या हाती संविधान द्या..
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, मुली सासरी जाताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान द्यावे, कारण मुलींनी संविधान वाचावे यासाठीच सावित्रीने अंगा खांद्यावर शेणा मातीचे गोळे सहन केले. मात्र, आज सावित्रीच्या विचारांकडे कुठेतरी दुर्लक्ष केले जात आहे. समाजाची ही मानसिकता बदलण्याची आज गरज आहे.





