नैसर्गिक आपत्तीचा धैर्याने सामना करणे गरजेचे – सभापती राम शिंदे

जामखेड – जामखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिके, घरे, विहिरी, पशुधन आणि ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन बाधित झाले आहे. याची दखल घेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीचे निरीक्षण केले आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
दरडवाडी येथे नुकसानग्रस्त पुलाची, मोहरी येथे तुटलेल्या तलावाची, तसेच दिघोळ आणि जातेगाव येथे मांजरा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमिनी आणि घरांचे नुकसान याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अल्का अहिरराव, तहसीलदार मच्छिंद्र ठाणके यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे यांनी प्रशासनाला सरसकट पंचनामे करून त्वरित मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी हमी त्यांनी दिली. “नैसर्गिक संकटात घाबरून न जाता धैर्याने सामना करा. एकमेकांचे सहकार्य आणि प्रशासनाचे पाठबळ यामुळे आपण हे संकट पार करू,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले. ग्रामस्थांनीही दक्षता घेऊन जीवितहानी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.





