Nagar : सभापती राम शिंदे यांना धक्का; कवडगाव-गिरवली सोसायटी रोहित पवारांच्या ताब्यात

जामखेड : तालुक्यातील कवडगाव-गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे मिठू महादेव खोसे यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारास जोरदार टक्कर दिली. यावेळी एक मत बाद होऊन दोन्ही उमेदवारांना समान ६-६ मते पडली. यानंतर चिठ्ठीद्वारे मिठू खोसे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
या निवडणुकीमध्ये मंगेश आजबे, संपत राळेभात, शहाजी राळेभात, प्रशांत राळेभात, सखाराम भोरे, नाना आढाव यांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळे मागील ३ वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली ही संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.
या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित चेअरम मिठू महादेव खोसे यांचा सत्कार जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील सभागृहात करण्यात आला. बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सांगितले की, मागील ३ वर्षाच्या कार्यकाळात दोन्ही गावातील अनेक नवीन सभासदांना पिक कर्जापासून वंचित ठेवले आहे. अशा सर्व सभासदांना संस्थेचे नवीन सभासद करून घेऊन तत्काळ पिक कर्ज वितरण करण्यात येईल.
बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कर्ज योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जातील, असे सांगून कवडगाव-गिरवली संस्थेस सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे आश्वासन दिले. यावेळी मार्केट कमेटीचे संचालक सुधीर राळेभात, अभिमन्यू खोसे, सखाराम भोरे, नाना आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कोंडीबा चोरखले, हरिश्चद्र भोईटे, सीताराम कांबळे, संगीता नन्नवरे, महादेव भोरे हे संचालक तसेच गावातील पप्पू खोसे, युवराज खोसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





