Sachin Tendulkar : ‘तो फक्त एक योगायोग…!’, बुमराहवर टीका करणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर

Sachin Tendulkar Defends Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. ज्यामध्ये भारताने आणि इंग्लंडने प्रत्येकी २-२ सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राहिली. विशेष म्हणजे या मालिकेत भारताने जे दोन सामने जिंकले, त्या दोन्ही सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.
याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर काही चाहते बुमराहवर जोरदार टीका करत आहेत आणि त्याला ट्रोल करत आहेत. दरम्यान सचिन तेंडुलकर बुमराहच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. सचिनने तेंडुलकरने बुमराहला पाठिंबा देताना टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्याने आपल्या वक्तव्यात बुमराहच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि त्याला अनावश्यकपणे लक्ष्य करण्यावरून टीकाकारांना सुनावले. सचिनच्या या पाठिंब्यामुळे बुमराहच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जसप्रीत बुमराह अविश्वसनीय गोलंदाज -सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने जसप्रीत बुमराहला करिश्माई आणि अविश्वसनीय वेगवान गोलंदाज संबोधत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. बुमराहने या मालिकेत केवळ तीन सामने खेळले आणि १४ विकेट्स घेतल्या. बर्मिंगहॅम आणि द ओव्हल येथील भारताच्या विजयाबाबत सचिन म्हणाला, “बुमराहच्या अनुपस्थितीत मिळालेले हे विजय केवळ योगायोग आहेत.” बुमराहला वर्कलोड व्यवस्थापनामुळे दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती आणि भारताने तेच सामने जिंकले.
हेही वाचा – Fox Interrupt Match : लॉर्ड्सवर घडली अनपेक्षित घटना; कोल्ह्यामुळे थांबवावा लागला सामना, VIDEO होतोय व्हायरल
सचिन बुमराहबद्दल काय म्हणाला?
रेडिटवर मालिकेचे विश्लेषण करताना तेंडुलकर म्हणाला, “बुमराहने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात पाच विकेट्स घेत शानदार सुरुवात केली. दुसऱ्या कसोटीत तो खेळला नाही, पण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याने पुन्हा एकदा पाच विकेट्स घेत आपली छाप पाडली. ज्या दोन सामन्यांमध्ये तो खेळला नाही, तिथे आपण जिंकलो, पण मला वाटतं हा केवळ योगायोग आहे.”
हेही वाचा – Mohammed Siraj : ‘तू सांगितलं का नाही…’, कर्णधार गिलवर सिराज का संतापला होता? पाहा VIDEO
बुमराह आणि सिराज यांची कामगिरी
तेंडुलकरने बुमराहच्या गोलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले आणि त्याला इतर गोलंदाजांपेक्षा सरस मानले. बुमराहने ४८ कसोटी सामन्यांत २१९ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने बुमराहच्या अनुपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केली. सिराजने पाचही सामन्यांत १८५.३ षटके टाकत २३ विकेट्स घेतल्या. सिराजच्या नावावर ४१ कसोटी सामन्यांत १२३ विकेट्स आहेत.





