अपक्षांवर अविश्वास दाखवणे अयोग्य – एकनाथ खडसे

जळगाव – मतदारावर विश्वास दाखवावा लागतो, मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो. मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही. आमदारांवर जी जबाबदारी सोपवली आहेत ते निश्चितपणे पार पाडलेली दिसत आहे. यामुळे अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत रणनीती काय असणार याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, पक्षाच्या वतीने आमदारांच्या भेटीगाठीची सुरुवात माघारीनंतर सुरू होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत हा अनुभव लक्षात घेता पक्ष आणि आम्ही सर्व मिळून अधिक काळजीपूर्वक या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे पाहत आहोत.
कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायची आणि या दृष्टीने सर्व मिळून प्रयत्न करायचे अशी भूमिका पक्षाने घेतली आहे, हिच आमची भूमिका आहे, असे खडसे म्हणाले.
तसेच पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, पंकजा मुंडे यांना डावलले याचे मला दुःख आहे. मुंडे-महाजन-खडसे या नावाने काही कालखंड भाजपाची ओळख होती. वर्षानुवर्ष अनेकांनी त्यात योगदान दिले. अनेकांच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला. मुंडे साहेब आमचे नेते होते. त्यांनी यासाठी उभे आयुष्य खर्ची घातले, त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला प्रामुख्याने पंकजाताईंसारख्या ओबीसी नेतृत्वाला ज्यांचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. अशा स्थितीत त्यांना डावलण्याचे काय कारण आहे हे मी समजू शकलेलो नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.




