Ram Nath Kovind : ‘डिजिटल ग्राहक’ न राहता ‘डिजिटल लीडर’ होणे महत्वाचे…; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन
भारताने गेल्या दोन दशकांत केलेल्या असाधारण विकास प्रवासामुळे देश आता केवळ 'महत्वाकांक्षी' न राहता जगासाठी एक 'प्रेरणादायक राष्ट्र' बनला आहे.

Ram Nath Kovind : भारताने गेल्या दोन दशकांत केलेल्या असाधारण विकास प्रवासामुळे देश आता केवळ ‘महत्वाकांक्षी’ न राहता जगासाठी एक ‘प्रेरणादायक राष्ट्र’ बनला आहे, असे गौरवद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी काढले. मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘भारत ॅट २०४७’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी राष्ट्रपती कोविंद यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकत म्हटले की, जागतिक महामारी आणि भू-राजकीय तणावाच्या काळातही भारताने आपला विकासदर कायम राखला आहे.
गेल्या १० वर्षांत आपला जीडीपी दुप्पट करणारी भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे, २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढणे हा भारताच्या यशोगाथेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी नमूद केले.
संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारत आता ८० हून अधिक देशांना संरक्षण उपकरणांची निर्यात करत असून प्रगत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे. भारताने आता केवळ ‘डिजिटल ग्राहक’ न राहता ‘डिजिटल लीडर’ होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मते, आजच्या सुधारणा संकटातून नव्हे, तर आत्मविश्वासातून जन्माला येत आहेत.
विकसित भारताचा संकल्प :
पुढील दोन दशके आपल्या देशासाठी निर्णायक असतील. विकसित भारताचे यश हे प्रत्येक नागरिकाला मिळणारा सन्मान, संधी आणि सक्षमीकरण यावर मोजले जाईल, असे कोविंद यांनी बोलताना स्पष्ट केले.
याच कार्यक्रमात पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनीही भारताच्या वाढत्या जागतिक आदराचा उल्लेख करत, देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला.





