IT Engineer Suicide: आयटी अभियंता तरुणीची आत्महत्या! प्रियकराविरुद्ध खराडी पोलिसांत गुन्हा…नेमकं काय घडलं?
IT Engineer Suicide: खराडी परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या बिहारच्या २३ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रियकर प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल.

IT Engineer Suicide – प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तरुणीच्या ४९ वर्षीय काकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमृतकुमार अरुणकुमार सिंह (२३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी मूळची बिहारमधील पाटणा येथील असून, आरोपी हा पहाडगंज येथील रहिवासी आहे. दोघांचे शालेय शिक्षण एकत्र झाले होते. त्यानंतर तरुणीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती, तर आरोपी नोएडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. मयत तरुणी मागील दोन महिन्यांपासून पुण्यात राहात होती. तिने नुकतीच नवीन सदनिका भाड्याने घेतली होती.
भाडेकरार करून सोमवारपासून ती या सदनिकेत राहायला जाणार होती. दरम्यान, आरोपी दोन दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली उतरला. त्याच वेळी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





