D.K.Shivakumar : ‘ती’ व्यक्तिगत श्रद्धेची बाब; डी.के.शिवकुमार यांनी स्वतःच्या कृतीचे केले कौतुक

बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना महाशिवरात्री सोहळ्यातील सहभागावरून स्वपक्षातूनच होणाऱ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, व्यक्तिगत श्रद्धेची बाब असल्याचे म्हणत त्यांनी स्वत:च्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनने महाशिवरात्रीनिमित्त तामीळनाडूत विशेष सोहळ्याचे आयोजन केले. त्या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवकुमार उपस्थित राहिले.
शिवकुमार यांची ती कृती कर्नाटक कॉंग्रेसच्या एका गटाला रूचलेली नाही. भाजपच्या विचारसरणीशी शिवकुमार जुळवून घेत असल्याच्या शब्दांत त्या गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर शिवकुमार यांनी भूमिका स्पष्ट केली. सद्गुरू मुळचे कर्नाटकचे आहेत. कावेरी नदीच्या पाण्यासाठी ते लढा देत आहेत.
त्यांनी माझी भेट घेऊन मला निमंत्रण दिले. त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी आहे. ते चांगले कार्य करत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले. मीही उपस्थित राहिलो. ती बाब व्यक्तिगत श्रद्धेशी निगडीत आहे. सगळ्या जाती-धर्मांवर माझा विश्वास आहे. सर्वांना समवेत घेणे हीच कॉंग्रेसची विचारसरणी आहे. कुठला भेदभाव मी करत नाही.
कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, असे परखड भाष्य त्यांनी केले. शिवकुमार यांच्या पाठिशी त्यांचे बंधू आणि माजी खासदार डी.के.सुरेश हेही ठामपणे उभे राहिले. कुठल्याही कार्यक्रमातील सहभागाविषयीची माहिती शिवकुमार आधीच कॉंग्रेसला देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची असली तरी त्यांनी नेहमीच पक्षश्रेष्ठींना कळवले. महाशिवरात्री सोहळ्यातील सहभागाबाबतही त्यांनी आधीच पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. शिवकुमार यांची ती कृती गुप्त नव्हती, असे सुरेश इतरत्र पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मी कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता
मुख्यमंत्री बनवावे यासाठी शिवकुमार कॉंग्रेस श्रेष्ठींना ब्लॅकमेल करत आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, त्या चर्चा शिवकुमार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या. ब्लॅकमेल करणे, अटी मांडणे माझ्या रक्तात नाही. मी कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. गांधी परिवारावर माझी निष्ठा आहे. त्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भ्रमात आहेत. कर्नाटकमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडण्याचे भाजप नेत्यांकडून केले जाणारे भाकीत बोगस आहे. भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपने स्वत:चे घर व्यवस्थित ठेवावे. भाजप म्हणजे विभाजन झालेले घर आहे. तर, कॉंग्रेसचे घर अविभाजित आहे, अशी शाब्दिक टोलेबाजीही त्यांनी केली.





