Anna Hazare banner : पुण्यात पोस्टरद्वारे मतचोरीचा मुद्दा; अण्णा आता तरी उठाचा नारा!

Anna Hazare banner : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी केलेलं आंदोलन देशभरात गाजलं होतं. या आंदोलनाची दखल सरकारला घेण भाग पडलं होतं. तसेच माध्यमांनीही अण्णांचं आंदोलन सर्वदूर पोहचलं होतं.
लोकायुक्त आणि लोकपाल यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर अण्णा हजारेंच आंदोलन कुठे दिसलं नाही, यामुळे अनेकदा त्यांना सोशल मीडियावरून ट्रोल केलं जातं. अशातच आता पुण्यात त्यांचे बॅनर लावून अण्णांना प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच या पोस्टरमधून अण्णा आता तरी उठा असा नारा देत मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे बॅनर लावून या बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले आहेत. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. अण्णा आतातरी उठा….कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता… तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा…..असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
बॅनरमध्ये काय लिहिलं आहे?
देशात मतांची चोरी होत असताना,
देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,
देशात हुकूमशाही माजलेली असताना,
देशाची लोकशाही धोक्यात असताना,
अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
असा सवाल या बॅनरमधून अण्णा हजारेंना विचारण्यात आला आहे. अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे, अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते सातत्याने या मुद्यावर भाष्य करत महाराष्ट्रातही मतचोरी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून केंद्रीय पातळीवरील राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवारांचा दावा अन्…
शरद पवार यांनीही निवडणुकांपूर्वी 2 व्यक्ती भेटल्याचा दावा केला होता. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच पुण्यात अण्णा हजारेंनी आता तरी सरकारला सवाल करावे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : Pune rains : पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज





