शाब्बास! ‘नासा’च्या हबल दुर्बिणीला मागे टाकत इस्रोच्या ‘ऍस्ट्रोसॅट’चे मोठे यश

पुणे : भारताचा पहिला बहू-तरंगलांबी (मल्टिवेव्हलेन्थ) उपग्रह “ऍस्ट्रोसॅट’ने 9.3 अब्ज प्रकाशवर्ष दूरवर असणाऱ्या “AUDFs01′ या दीर्घिकेतील उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदवली आहेत. विश्वातील ताऱ्यांचा जन्म होणाऱ्या अशा काळातील अतिनील उत्सर्जनामध्ये हायड्रोजन अणूला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये विभाजित करण्याची पुरेशी उर्जा असते. कॉस्मिक कृष्णयुगानंतर जन्मास येणाऱ्या आयनीभवनावर आधारित विश्वाची निर्मिती करण्यामध्ये या अतिनील किरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुण्यातील ‘द इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’तील सहयोगी प्राध्यापक कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हा शोध लावला आहे. दि.24 ऑगस्ट रोजी “नेचर ऍस्ट्रॉनॉमी’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधन गटामध्ये भारत, स्वित्झर्लंड, फ्रान्स, यूएसए, जपान आणि नेदरलॅंड्स या देशांतील वैज्ञानिकांचा समावेश आहे.
साहा यांच्या नेतृत्त्वाखालील संशोधनगटाने ऑक्टोबर 2016 मध्ये हबल एक्सट्रीम डीपफील्ड मध्ये असलेल्या दीर्घिकेकडे इस्रोच्या “ऍस्ट्रोसॅट’च्या मदतीने दोन तासांपेक्षा अधिक जास्त काळ निरीक्षणे नोंदवली. परंतु त्यानंतर उत्सर्जन खरोखरच हे त्या दीर्घिकेकडून होत आहे, हे निश्चित करण्यासाठी उपलब्ध डेटाचे काळजीपूर्वक विश्लेषण करण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली.
विश्वातील प्रकाश आगमनाबाबत महत्त्वाचे संशोधन
“इस्रो’ने 28 सप्टेंबर 2015 रोजी प्रक्षेपित केलेल्या “ऍस्ट्रोसॅट’ उपग्रहावर “यूव्हीआयटी’ दुर्बीण बसवली होती. तिपेक्षा लक्षणीय मोठी असलेल्या “नासा’च्या हबल अवकाश दुर्बिणीला या दीर्घिकेतील अतिनील उत्सर्जन टिपता आले नाहीत. “यूव्हीआयटी’ला ही मोठी अवघड कामगिरी साधता आली. क्वचितच एखाद्या दुर्मिळ प्रसंगी आपल्याला या प्रकाशकणांचे निरीक्षण करता येणे शक्य होते, असे सहलेखक प्रा. ऍन वर्मे या खगोलशास्त्रज्ञाचे सांगितले.
“दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती कशी होत असेल, हे अतिनील किरणांच्या तरंगलांबीच्या आधारे तपासून पाहण्याची संधी वैज्ञानिकांना या शोधामुळे खुली झाली आहे. भारतीय सुविधा वापरुन आपण अशी उत्कृष्ट कामे करू शकतो,’ हे तरूण वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायक आहे, अशी माहिती “आयुका’ने म्हटले आहे.





