Digital Payment : 10 वर्षांत UPI ची डिजिटल क्रांती; 1.78 कोटींवरून 24,162 कोटी व्यवहारांपर्यंत झेप
Digital Payment : UPIच्या 10 वर्षांच्या प्रवासात व्यवहारांची संख्या 1.78 कोटींवरून 24,162 कोटींवर पोहोचली. जाणून घ्या UPIच्या वाढीचे महत्त्वाचे आकडे.

Digital Payment : भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा बनलेली युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणाली आपल्या प्रवासाची 10 वर्षे पूर्ण करत आहे. 25 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI)ने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) देखरेखीखाली UPI सुरू केले. अवघ्या काही बँकांपासून सुरू झालेली ही व्यवस्था आज देशातील डिजिटल व्यवहारांची प्रमुख प्रणाली बनली आहे.
44 बँकांपासून 741 बँकांपर्यंत प्रवास –
UPI सुरू होण्यापूर्वी एप्रिल 2016 मध्ये 21 बँका या प्रणालीशी जोडल्या गेल्या होत्या. ऑगस्ट 2016 मध्ये पहिल्या महिन्यात केवळ 90 हजार व्यवहार झाले. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये UPIशी जोडलेल्या बँकांची संख्या 44 होती. ही संख्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 703 आणि जुलै 2026 पर्यंत 741 वर पोहोचली. सरकारी, खासगी, स्मॉल फायनान्स, पेमेंट्स आणि सहकारी बँकांना जोडत UPIची व्याप्ती देशाच्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचली आहे.
व्यवहारांमध्ये तब्बल 13 हजार पट वाढ –
UPIच्या व्यवहारांच्या संख्येत गेल्या दशकात सुमारे 13 हजार पट वाढ झाली. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 1.78 कोटी असलेली वार्षिक व्यवहारसंख्या 2025-26 मध्ये तब्बल 24,162 कोटींवर पोहोचली. या काळात 188 टक्के CAGR नोंदवला गेला.
व्यवहारांच्या मूल्यामध्येही मोठी वाढ झाली. 2016-17 मध्ये 0.07 लाख कोटी रुपये असलेले व्यवहारमूल्य 2025-26 मध्ये सुमारे 314 लाख कोटी रुपयांवर गेले. म्हणजेच जवळपास 4 हजार पट वाढ झाली असून, या कालावधीत 155 टक्के CAGR नोंदवण्यात आला.
2026 मध्ये दररोज सरासरी 66 कोटी UPI व्यवहार झाले. जुलै 2026 मध्ये 2,366 कोटी व्यवहार झाले असून त्यांचे एकूण मूल्य 29.88 लाख कोटी रुपये होते. हा विक्रमी स्तर ठरला.
छोट्या व्यवहारांसाठीही UPIला पसंती –
UPIचा वापर आता दैनंदिन खरेदीपासून विविध प्रकारच्या पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पर्सन-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांचा एकूण व्यवहारसंख्येत 63 टक्के वाटा होता. यावरून छोट्या किरकोळ खरेदीसाठी UPIचा वापर किती वाढला आहे, हे स्पष्ट होते.
दुसरीकडे, पर्सन-टू-पर्सन (P2P) व्यवहारांचा एकूण व्यवहारमूल्यात 71 टक्के वाटा होता. P2M व्यवहारांपैकी तब्बल 86 टक्के व्यवहार 500 रुपयांपेक्षा कमी रकमेचे आहेत. त्यामुळे छोट्या खर्चासाठीही नागरिक रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटला पसंती देत असल्याचे दिसून येते.
जागतिक डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा दबदबा –
UPIने देशाच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावरही आपली ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) UPIला जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. 2025 मध्ये जगभरातील रिअल-टाइम व्यवहारांच्या संख्येत UPIचा वाटा सुमारे 49 टक्के होता.
सध्या UPI 11 देशांमध्ये कार्यरत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE), फ्रान्स, भूतान, श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, मॉरिशस, कतार, कंबोडिया, ग्रीस आणि मालदीव या देशांचा त्यात समावेश आहे.
पुढील दशकात नव्या विस्ताराचे लक्ष्य –
UPIच्या पुढील दशकात डिजिटल पेमेंटचा विस्तार आणखी वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. नव्या ग्राहकांसह अधिक व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट व्यवस्थेशी जोडणे, तांत्रिक प्रगतीला चालना देणे आणि आर्थिक समावेशन वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. सुरक्षित, वेगवान आणि सुलभ डिजिटल व्यवहारांची सुविधा देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.





