ISRO News : इस्रोमधील 100 शास्त्रज्ञांचे तडकाफडकी राजीनामे; नेमकं काय घडलं?
गेल्या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत इस्रोमधील (ISRO News) तब्बल १०० अनुभवी शास्त्रज्ञांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ISRO News : भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचवणारी, जगातील अत्यंत अवघड मानली जाणारी ‘मंगळ मोहीम’ पहिल्याच प्रयत्नात फत्ते करणारी आणि अमेरिकेच्या ‘नासा’सारख्या बलाढ्य अंतराळ संस्थेला आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाने तगडी टक्कर देणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ (ISRO News) सध्या एका वेगळ्याच संकटामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत इस्रोमधील (ISRO News) तब्बल १०० अनुभवी शास्त्रज्ञांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, राजीनामा देणारे हे सर्व शास्त्रज्ञ भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेवर, म्हणजेच ‘गगनयान’ प्रकल्पावर काम करत होते.
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने तंत्रकुशल आणि अनुभवी शास्त्रज्ञांनी सामूहिकरीत्या पाठ फिरवल्यामुळे इस्रोच्या (ISRO News) भविष्यातील सर्वच मोहिमांवर आणि देशाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ स्वप्नांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या या शास्त्रज्ञांमध्ये इस्रोच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये बंगळुरू येथील ‘यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर’मधून सुमारे ८० कर्मचाऱ्यांनी, तर तिरुवनंतपुरम येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’मधून किमान २० शास्त्रज्ञांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे.
गगनयानसारखी गुंतागुंतीची आणि संवेदनशील मोहीम अगदी अंतिम टप्प्यात असताना, अशा प्रकारे प्रमुख मनुष्यबळाने एकापाठोपाठ एक राजीनामे देण्याच्या धडाक्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाने (DOS) आता थेट हस्तक्षेप केला असून एक अत्यंत मोठा आणि प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका विशेष आदेशानुसार, केंद्र सरकारने राजीनामा मंजुरीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला आहे. आतापर्यंत कोणत्याही केंद्राच्या संचालकांना त्यांच्या स्थानिक पातळीवर कर्मचाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्याचे पूर्ण अधिकार होते. मात्र, नवीन नियमांनुसार संचालकांचे हे अधिकार तातडीने गोठवण्यात आले आहेत.
यापुढे इस्रोच्या (ISRO News) कोणत्याही केंद्राच्या संचालकाला अशा राजीनाम्यांना परस्पर मंजुरी देता येणार नाही. गगनयान तसेच इतर महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी थेट जोडल्या गेलेल्या ‘ग्रुप ए’ दर्जाच्या शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा त्यांची स्वेच्छानिवृत्ती (VRS) आता इथून पुढे नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून हाताळली जाणार नाही.
सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, शास्त्रज्ञांच्या राजीनाम्याचा किंवा व्हीआरएसचा कोणताही अर्ज आल्यास तो थेट केंद्र सरकारच्या मुख्य अंतराळ विभागाकडे (Department of Space) पाठवला जाईल. या अर्जावर सखोल विचार करून अंतिम निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आता केवळ अंतराळ विभागाकडेच राखीव असेल.
भारतासाठी ‘गगनयान मोहीम’ ही केवळ एक वैज्ञानिक मोहीम नसून ती देशाच्या जागतिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच आपल्या अंतराळवीरांना सुरक्षितपणे अवकाशात पाठवून परत आणणार आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर एवढ्या मोठ्या संख्येने बुद्धिवान शास्त्रज्ञांचे संस्थेतून बाहेर पडणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे.
शास्त्रज्ञ अचानक इस्रो (ISRO News) का सोडत आहेत, यामागची नेमकी कारणे अद्याप गुलदस्त्यात असली, तरी आगामी काळात इस्रोतील हे अमूल्य मनुष्यबळ टिकवून ठेवण्यासाठी आणि शास्त्रज्ञांचे हे पलायन थांबवण्यासाठी सरकारकडून काही मोठी व ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






