इस्रो घेत आहे वेध सूर्याचा..! ‘आदित्य एल1’च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू

नवी दिल्ली – “चांद्रयान-3′ द्वारे चंद्राचा वेध घेण्याची प्रक्रिया सुरु असतानाच, भारतीय अंतराळ संस्था इस्रो आता सूर्याचाही वेध घेणार आहे. त्यासाठी इस्रोच्या “सन मिशन “आदित्य एल1′ च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे.
इस्रोने सांगितले की आदित्य एल1 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवर पोहोचले आहे. आदित्य एल1 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकते. हे रॉकेट इस्रोच्या युआर राव उपग्रह केंद्रात तयार करण्यात आले आहे.
“आदित्य एल1′ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले इस्रोचे हे पहिलेच मिशन आहे. आदित्य एल1 हे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅन्ग्रेस बिंदूच्या जवळ असलेल्या प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल. हे पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.
“आदित्य एल1′ पॉईंटच्या जवळ असलेल्या हॅलो ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, येथून सूर्याचे सतत निरीक्षण केले जाऊ शकते आणि सूर्यग्रहणाचा त्यावर परिणाम होत नाही. सूर्याच्या हालचालींचे विश्लेषण आणि अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करताना याचा मोठा फायदा होणार आहे.
आदित्य एल1 सोबत सात पेलोड्सही अवकाशात पाठवले जातील. हे पेलोड्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरच्या मदतीने सूर्याच्या फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करतील.
यापैकी चार पेलोड सूर्याचे सतत निरीक्षण करतील आणि उर्वरित तीन पेलोड परिस्थितीनुसार कण आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करतील.
“आदित्य एल1’चे पेलोड्स सूर्याचे कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलाप आणि अवकाशातील हवामानावर सूर्यप्रकाशातील क्रियाकलापांच्या प्रभावाविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतील.
आदित्य एल1 मिशनच्या उद्दिष्टांबद्दल सांगताना ते सूर्यमालेच्या वरच्या वातावरणातील गतिशीलतेचा अभ्यास करेल. यासोबतच क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हिटिंग, आयनाइज्ड प्लाझमाची भौतिकता इत्यादींचा अभ्यास केला जाईल.





