ISRO chief Somanath : इस्रोच्या अध्यक्षांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन अखेर रद्द ; के. सिवन यांच्यावरील ‘त्या’ टिप्पणीमुळे गोंधळ

ISRO chief Somanath : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी निलावु कुदिचा सिम्हंगल हे आत्मचरित्र लिहिले असून इस्रोमधील आपल्या दशकांच्या वाटचालीत त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना तोंड दिले त्याचा लेखाजोखा यात मांडला आहे. आपले हे पुस्तक कोणा व्यक्तीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र या पुस्तकांचे प्रकाशन अचानक रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत कथित टिप्पणी केली असल्याचा दावा करून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी प्रकाशन थांबवले असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.
चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते. परंतु, या आत्मचरित्राचे प्रकाशन त्यांनी थांबवले आहे. या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. परिणामी त्यांनी प्रकाशन मागे घेतले.
एस. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता के. सिवन (इस्रोचे माजी अध्यक्ष) यांनी हस्तक्षेप केला होता, असा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. पुस्तक प्रकाशनाआधीच प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रती कोणाला तरी दिल्या असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एस सोमनाथ म्हणाले.
के. सिवन यांच्यावर टीका केल्याच्या दाव्यावर एस. सोमनाथ म्हणाले की, मी या पुस्तकातून कोणालाही व्यक्तिशः टार्गेट केलेले नाही. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एखाद्या संस्थेत पद मिळवण्याकरताही अनेक आव्हाने असतात. ही आव्हाने प्रत्येकाला झेलावी लागतात. एकाच पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात. मी हाच मुद्दा पुस्तकांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी यासंदर्भात कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केलेलं नाही. तसंच, चांद्रयान २ मोहीम अयशस्वी झाल्याच्या घोषणेच्या संदर्भात स्पष्टता नव्हती, असा उल्लेख या पुस्तकात केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यासोबतच जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिले असून कोणावरही टीका करण्याकरता लिहिलेलं नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.





