Israel Hamas War : मदतीचा ओघ वाढवण्यासाठी दिवसाचे हल्ले थांबवणार; इस्रायलच्या लष्कराने स्पष्ट केली भूमिका…

जेरुसलेम :- गाझाच्या दक्षिणेकडील भागामध्ये मदतीचा ओघ वाढवण्यासाठी दिवसा केले जाणारे हल्ले थांबवण्यात येतील, असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे या विस्थापितांची अवस्था दयनीय झाली आहे. विस्थापित पॅलेस्टिनींसाठी पाठवल्या जाणाऱ्या मदतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हल्ल्यांच्या स्थगितीचा निर्णय रफाह शहरातील १२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागू असणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिसरामध्ये पूर्ण युद्धबंदीची मागणी केली होती. ती इस्रायलकडून अद्याप मान्य झालेली नाही. इस्रायलचा मित्र देश असलेल्या अमेरिकेनेही या भागामध्ये पूर्ण युद्धबंदीची मागणी केली आहे.
इस्रायलने जर ठरवल्याप्रमाणे या भागात युद्ध स्थगिती पाळली तर पॅलेस्टिनींच्या किमान गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील. इस्रायलने रफाह शहरावर हल्ले सुरू केल्यापासून पॅलेस्टिनींना आपल्या किमान गरजा देखील भागवणे अवघड झाले आहे. युद्ध स्थगिती सकाळी ८ वाजल्यापासून लागू होईल आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहिल. पुढील सूचना मिळेपर्यंत ही युद्ध स्थगिती लागू असेल, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
या युद्ध स्थगितीच्या काळात इस्रायलचे नियंत्रण असलेल्या केरेन शालोम क्रॉसिंग पर्यंत मदतीचे ट्रक जाऊ दिले जाणार आहेत. हा भाग उत्तर -पश्चिम गाझाला जोडणाऱ्या सालाह- अ-दिन महामार्गापर्यंत जाण्यासाठीचा मुख्य प्रवेगाचा आणि सुरक्षित मार्ग आहे, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. इस्रायलचे सैन्य मे महिन्याच्या प्रारंभी रफाहमध्ये घुसल्यामुळे मदतीसाठीचा हा मार्ग बंद झाला होता.
हा मार्ग मदतीसाठी खुला केल्यामुळे गाझामधील खान युनिस, मुवासी आणि मध्य गाझा या भागांपर्यंत मदत पोचवली जाऊ शकेल, असे गाझामध्ये मदत वितरण करणाऱ्या कोगॅट या इस्रायली लष्कराच्या शाखेने म्हटले आहे.
युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये इस्रायलच्या सैन्याने याच भागांना लक्ष्य केले होते. सध्या या भागांमध्ये गाझाच्या उत्तरेकडील सीमेतून मदत साहित्य पोचवले जाते आहे. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांबरोबरच्या चर्चेनंतर युद्ध स्थगितीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. स्थगितीबाबतच्या या वाटाघाटींबाबत संयुक्त राष्ट्राच्यावतीने कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.
Splash Pad Shooting : मिशीगनमधील स्वैर गोळीबारात 9 जखमी, 2 लहान मुलांचाही समावेश…
संपूर्ण युद्धबंदीबाबत अजूनही वाटाघाटी सुरूच…
युद्धबंदीबाबतच्या प्रस्तावाबाबत इस्रायल आणि हमासमध्ये अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या युद्धबंदी प्रस्तावात ओलिसांची सुटका, इस्रायलच्या सैन्याची माघार आणि मदत वितरणाचे नियोजन सविस्तरपणे देण्यात आले आहे. हा प्रस्ताव इस्रायलच्या बाजूने असल्याचे बायडेन यांनी म्हटले असले, तरी इस्रायलने अद्याप या प्रस्तावाला पूर्णपणे मान्यता दिलेली नाही. हमासने या प्रस्तावात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्या इस्रायलला मान्य नाहीत.





