israel-hamas war : गाझामधील पॅलेस्टिनींची मृतांची संख्या ७३ हजारांवर
इस्रायल-हमासमधील युद्धादरम्यान गाझा पट्टीत ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या ७३ हजार इतकी झाली आहे, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

israel-hamas war – इस्रायल-हमासमधील युद्धादरम्यान गाझा पट्टीत ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या ७३ हजार इतकी झाली आहे, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी करार झाला असतानाही इस्रायलने गाझाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
शनिवारी मृतांची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये हा आकडा ७३ हजारांच्यापुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अभिलेख विभागाचे प्रमुख झाहर अल-वाहेदी आणि मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाचे हमजा सालेम यांच्याकडून याला दुजोरा मिळाला.
युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ७३,००१ मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यूंपैकी सुमारे अर्धे मृत्यू महिला आणि मुलांचे आहेत, असे मानले जाते आहे.
इस्रायलच्या गोळीबारामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दक्षिणेकडील खान युनिस शहरात २ आणि मध्य गाझामध्ये एकाचा मृत्यू झाला, याव्यतिरिक्त पूर्वी झालेल्या जखमांमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला, असे मंत्रालयाने रविवारी सांगितले.
शनिवारी संध्याकाळी खान युनिसमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात दोन पॅलेस्टिनी ठार झाले. तर जखमींना नासेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट सोसायटीने म्हटले आहे.




