देर अल-बलाह : गाझा पट्ट्यातल्या रुग्णालयाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर इस्रायलकडून आज पुन्हा हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक वैद्यकीय कर्मचारी ठार झाला आणि अन्य ९ जण जखमी झाले, असे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. मुवासी भागातल्या कुवेती फिल्ड रुग्णालयावर हा हवाई हल्ला झाला. या रुग्णालयाच्या आवारात हजारो पॅलेस्टिनींनी तंबू ठोकून आश्रय घेतला आहे. जखमी झालेले सर्व रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी आहेत. जखमींपैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले. या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हमासविरोधात गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने या रुग्णालयावर अनेक वेळा हवाई हल्ले केले आहेत. या रुग्णालयाच्या आवारात हमासचे दहशतवादी लपले असून या रुग्णालयाच्या आवाराचा वापर लष्करी कारणासाठी केला जात असल्याचा इस्रायली सैन्याचा आरोप आहे. मात्र रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे आरोप पहिल्यापासून फेटाळून लावले आहेत. इस्रायली सैन्याकडून बेपर्वाईने नागरिकांना आणि आरोग्य सुविधांना धोक्यात आणले जात असल्याचा आरोपही रुग्णालयाने केला आहे. रुग्णालय चालवणाऱ्या जेरुसलेमच्या एपिस्कोपल डायोसिसने या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे.