इस्रायलकडून पुन्हा युद्धबंदी अंमलबजावणी सुरू !

तेल अवीव – गाझा युद्धबंदी कराराची अंमलबजावणी पुन्हा सुरू केली आहे, असे इस्रायली लष्कराने बुधवारी सांगितले. हमासकडून युद्धबंदीच्या उल्लंघनांना प्रत्युत्तर म्हणून गाझा भागात इस्रायलने हल्ल्यांची मालिकाच केली होती. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलने गाझा येथे हवाई हल्ले सुरू केले, त्यामध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला.
यामुळे हमास-इस्रायलमधील युद्धबंदी धोक्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा युद्धबंदी लागू झाल्याचे जाहीर केले आहे. युद्धबंदी कराराचे पालन केले जाईल आणि कोणत्याही उल्लंघनाला कडक प्रत्युत्तर देतील, असे इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
इस्रायली विमानांनी गाझा पलीकडे हल्ले केले असले आहेत. तसेच इस्रायल आणि हमास युद्धबंदीच्या उल्लंघनासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाही युद्धबंदीला धोका नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इस्रायली हल्ल्यात किमान ७० जणांचा मृत्यू झाला.
यात मध्य गाझा पट्टीतील बुरेईज निर्वासित छावणीतील एका घरावर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा शहराच्या सब्रा परिसरातील एका इमारतीवर ४ आणि खान युनिसमधील एका कारवर ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
जेंव्हा आवश्यकता असेल, तेंव्हा इस्रायलने प्रत्युत्तर दिलेच पाहिजे, अशा शब्दात ट्रम्प यांनी इस्रायलच्या कारवाईचे समर्थन केले. कोणत्याही गोष्टीमुळे युद्धबंदी धोक्यात येणार नाही. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मध्य पूर्वेतील शांततेचा हमास हा एक अतिशय छोटासा भाग आहे आणि त्यांना वागावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.
हमासने युद्धबंदीचे उल्लंघन करून तथाकथित यलो लाईनमध्ये तैनात असलेल्या इस्रायली सैन्यावर हल्ला केला होता, असे एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. मात्र दक्षिण गाझामधील रफाह येथे इस्रायली सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हमासने नाकारली आणि युद्धबंदी कराराचे पालन करत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.





