israel-iran war : इस्रायल- इराण संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच; तेल विहीरींसह इमारतींचेही नुकसान

जेरुसलेम – इस्रायल आणि इराणमधील संघर्ष रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला जातो आहे आणि यामुळे दोन्ही देशांमधील मृताचा आकडाही वाढतो आहे. इराणने आपले हल्ले सुरूच ठेवले तर यापेक्षाही भीषण हल्ले केले जातील, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयावर आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित ठिकाणांना देखील लक्ष्य केले. तर इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला चुकवून इराणच्या क्षेपणास्त्रे इस्रायलच्या खोल आतमध्ये काही इमारतींलर जाऊन धडकली.
दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यांनी देखील इराणला यापेक्षाही जास्त मोठा हल्ला होण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर अमेरिकेविरोधात दिले गेले, तर हा मोठा हल्ला अमेरिकेच्या फौजांकडून दिला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणच्या हल्ल्यात इस्रायलमधील १० ठार झाले. शुक्रवारपासून इस्रायलमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. तर इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये ७० पेक्षा जास्त लोक ठार झाले असल्याचा अंदाज आहे.
तर संयुक्त राष्ट्राच्या अणू निरीक्षक संस्थेने घातक अण्वस्त्रांच्या साठवणुकीविषयीचे नयम न पाळल्याबद्दल इराणवर ताशेरे ओढले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने युरेनियम समृद्धीकरणासाठीची आपली तिसरी अणू भट्टी कार्यान्वित करायची घोषणा गुरुवारी केली होती.
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलच्या तेलशुद्धिकरण विरींचेही नुकसान झाले आहे. उत्तरेकडील हाइफा शहरातल्या तेलविरींचे नुकसान झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या तेलविहीरींचे काम सुरू असले, तरी या प्रकल्पाच्या काही सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे बंद करण्यात आलेली इस्रायलची हवाई हद्द आज देखील बंदच आहे.
तर इराणी नागरिकांनी इराणच्या शस्त्रे गोदामांपासून दूर जावे, असा सूचक इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते कर्नल. अविचय अद्राई यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये हा इशारा दिला.
कर्नल अद्राई यांनी गाझा, येमेन आणि लेबेनॉनमधील हल्ल्यांच्या आगोदर देखील तेथील जनतेला असा इशारा दिला होता. इस्रायलच्या हल्ल्यात संभाव्य वाढ होण्याची शक्यता असताना इराणने मात्र जर इस्रायलने हल्ले थांबवले, तर इराण देखील हल्ले थांबवण्यास तयार असल्याची समझोत्याची भूमिका घेतली आहे.
अमेरिकेबरोबरची चर्चा रद्द
इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अणू कार्यक्रमासंदर्भातीलवाटाघाटी सुरू आहेत. या वाटाघाटींमधील सहावी फेरी आज ओमानची राजधानी मस्कत येथे होणार होती.
मात्र इस्रायलच्या हल्ल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर ही चर्चा रद्द करण्यात आली. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या चर्चेला काही अर्थच उरला नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
इराणला अणूबॉम्ब बनवायचा नाही, इस्रायलविरुद्धच्या संघर्षात आपल्याला शस्त्रांची आवश्यकता नाही, मात्र आपला अणू कार्यक्रमांचा अधिकार कायम राहिला पाहिजे, हा मुद्दा असलेल्या करारासाठी इराण तयार आहे, असे अराघची यांनी म्हटले आहे.





