चुकीच्या नकाशाबद्दल इस्रायलने मागितली भारताची माफी

जेरुसलेम – भारताचा चुकीचा नकाशा इंटरनेटवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी इस्रायलने भारताची माफी मागितली आहे. इस्रायलने पोस्ट केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू काश्मीरला पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले होते. या नकाशाला भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर इस्रायलने दिलगिरी व्यक्त केली आहे.
इस्रायली संरक्षण दलांनी इराणी क्षेपणास्त्रांचा पल्ला दाखवणारा नकाशा शुक्रवारी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केला होता. या पोस्टवर भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लगेचच टीका केली. प्रसिद्ध झालेल्या नकाशामध्ये भारताच्या सीमा योग्य प्रकारे दाखवण्यात आले नसल्याचे भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपल्या आक्षेपामध्ये म्हटले होते.
भारत का तटस्थ आहे, हे आता तुम्हाला समजेल. मुत्सदेगिरीच्या बाबतीत कोणीच कोणाचा मित्र नसतो, असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याला उत्तर देताना आयडीएफने आपली चूक मान्य केली. आपण प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये सीमा योग्य आणि निश्चित नसल्याचे आयडीएफने म्हटले आहे.
ही पोस्ट प्रदेशाचे चित्रण आहे. हा नकाशा सीमांचे अचूक चित्रण करण्यात अयशस्वी ठरला आहे. या प्रतिमेमुळे झालेल्या कोणत्याही अपमानाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे आयडीएफने एक्सवर म्हटले आहे.
इराण हा जागतिक धोका आहे. इस्रायलचे हे अंतिम ध्येय नाही, ती फक्त सुरुवात आहे. आमच्याकडे कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे आयडीएफने म्हटले आहे. आयडीएफने यापूर्वी चुकीच्या नकाशा पोस्ट केला होता, त्यामध्ये इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्याचे समर्थन केले होते.
इस्रायलने आणखी एक नकाशा पोस्ट केला होता. त्यामध्ये इराणी क्षेपणास्त्रांचा पल्ला दाखवण्यात आला होता. नकाशाबाबतची चूक दुरुस्त करायला आपण सांगितले असल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत रेउवेन अझार यांनी देखील म्हटले आहे.





