Team India : तब्बल दोन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं चमकलं नशीब! सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नसतानाही थेट वर्ल्डकप संघात मिळालं स्थान

Ishan Kishan Selected for India T20 World Cup 2026 : बीसीसीआयने आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली असून, यामध्ये सर्वात धक्कादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे पुनरागमन. गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या इशानने आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि देशांतर्गत क्रिकेटमधील वादळी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नसतानाही संघात मिळालं स्थान –
इशान किशनसाठी हा प्रवास सोपा नव्हता. नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर होता. बीसीसीआयच्या शिस्तभंग कारवाईमुळे त्याला ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’मधूनही वगळण्यात आले होते. मात्र, बीसीसीआयच्या वार्षिक कराराचा भाग नसतानाही केवळ कामगिरीच्या जोरावर त्याची वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे.
SMATमध्ये पाडला धावांचा पाऊस –
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
Let’s cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
— BCCI (@BCCI) December 20, 2025
झारखंडचा कर्णधार असलेल्या इशान किशनने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने १० सामन्यांत तब्बल ५१७ धावा कुटल्या. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. तसेच १९७.३२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. अशा प्रकारे त्याने संपूर्ण स्पर्धेत ३३ षटकार आणि ५१ चौकार ठोकले. त्याच्या नेतृत्वाखाली झारखंडने पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने झळकावलेले शतक निवडकर्त्यांच्या मनावर ठसा उमटवणारे ठरले.
हेही वाचा – Shubman Gill : गिलने उपकर्णधारपदानंतर संघातील स्थानही का गमावलं? अजित आगरकरांनी केलं स्पष्ट, पाहा VIDEO
वादाचा पडदा पडला –
२०२३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानंतर आणि रणजी ट्रॉफी न खेळल्यामुळे इशानवर टीका झाली होती. बीसीसीआयने त्याच्यावर कठोर कारवाई करत त्याला करारातून बाहेर केले होते. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतल्यानंतर त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना उत्तर दिले आहे.टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलामीला आक्रमक पर्याय म्हणून आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनची भूमिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.





