Yugendra Pawar: ‘अजितदादांनंतर बारामतीला वाली उरला आहे का?’ युगेंद्र पवारांचा पोलिसांना थेट सवाल
महिला असुरक्षित, उद्योजकांवर हल्ले, ड्रग्ज माफियांचे जाळे अन् खंडणीखोरांचा उच्छाद

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून आता राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
शहरातील गोळीबार, खंडणीखोरी, कोयता गँगची दहशत, अमली पदार्थांची वाढती विक्री आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन कदम यांची भेट घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केवळ चिंता व्यक्त करून न थांबता त्यांनी शहरातील गुन्हेगारीचे वास्तव पोलिसांसमोर मांडत तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. बारामतीत एकापाठोपाठ घडणाऱ्या गंभीर घटनांचा संदर्भ देत युगेंद्र पवार यांनी पोलिसांना अनेक थेट सवाल केले. ‘अजितदादा असताना बारामतीला वाली होता; आता अजितदादांनंतर बारामतीला वाली उरला आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या मनातील अस्वस्थतेला वाचा फोडली.
युगेंद्र पवार म्हणाले की, बारामतीच्या विकासामुळे शहरात बाहेरील उद्योजक, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अनेकांनी येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे या विकासाच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. उद्योजकांवर गोळीबार, हल्ले आणि खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार घडत असतील, तर बारामतीत गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. (Yugendra Pawar)
‘आपण नवीन अधिकारी असल्याने आम्ही सुरुवातीला संयमाची भूमिका घेतली. मात्र, आपण रुजू होऊन सहा महिने उलटले तरी गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. आता हे आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली.
भिगवण रस्त्यावरील सम्यक परिसरातील चौकात एका वाहनचालकाने थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर थार घालण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ला करण्याचे धाडस होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बारामतीत महिलांना रात्री घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातही अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे पसरत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. कोयता गँगकडून दहशत निर्माण केली जात आहे, खंडणीखोरांकडून व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे, तर उद्योजकांवरील गोळीबार आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
अजित पवार यांच्या काळात बारामतीत कायदा-सुव्यवस्थेबाबत एक वेगळा दरारा होता आणि गुन्हेगारांवर वचक असल्याची भावना नागरिकांमध्ये होती. मात्र, सध्याच्या घटनांमुळे ही परिस्थिती बदलत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत एकेकाळी आदर्श मानल्या जाणाऱ्या बारामतीची प्रतिमा धोक्यात येत असल्याचेही युगेंद्र पवार यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
वाढत्या गुन्हेगारीकडे केवळ स्वतंत्र घटनांच्या स्वरूपात न पाहता त्यामागील प्रवृत्ती आणि गुन्हेगारी नेटवर्कवर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थ विक्री करणारे, खंडणीखोर, दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या आणि हल्लेखोर यांच्यावर कठोर कारवाई करून पोलिसांनी आपला वचक निर्माण करावा. नागरिक, महिला आणि व्यावसायिकांना सुरक्षिततेची खात्री वाटेल, अशी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
बारामतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता केवळ पोलिसांचा राहिलेला नसून शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या विश्वासाशी जोडला गेला आहे. त्यामुळे या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासन प्रत्यक्ष कृतीतून काय उत्तर देते, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
Amla Ladoo: हिवाळ्यात रोज खा आवळ्याचे लाडू; आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी





