Uddhav Thackeray : ‘अजित पवारांच्या पुतळ्यासमोर बसून..’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर घणाघात
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Uddhav Thackeray : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी चर्चेत असलेल्या ‘मफलर मॅन’बाबत खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.
दिवंगत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली.
‘रोहित पवार जे म्हणतायत त्यात वावगं काय?’
उद्धव ठाकरे म्हणाले, “एकूण घटनाक्रम पाहिला तर व्हीएसआर कंपनीवर कारवाई झालेली दिसत नाही. रोहित पवार जे म्हणतायत त्यात वावगं आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर अमित शाह यांनी त्यांचे फोन उचलावेत.”
या वक्तव्यातून उद्धव ठाकरे यांनी रोहित पवारांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. तसेच या प्रकरणातील आरोपांची दखल घेऊन संबंधितांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका मांडली.
‘अमित शाहांनी अजित पवारांची माफी मागायला हवी होती’
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका करत अजित पवार यांच्यावरील जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र, त्याच अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते होणे ही दुर्दैवाची बाब आहे.”
तसेच अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर अमित शाह यांनी पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागायला हवी होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली.





