Special Story On Raju Shetti : राजू शेट्टी स्वतःच्याच संघटनेत एकाकी पडलेत का?

एकच गट्टी राजू शेट्टी (Raju Shetti). ही फक्त एक घोषणा नव्हती तर हा होता शेतकरी संघटनेचा खराखुरा आवाज. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचा लढा. मग तो रस्त्यावर असो वा संसदेतील. प्रस्थापितांना शिंगावर घेण्याची राजू शेट्टी (Raju Shetti) यांची पद्धत तशी जुनीच. आज शेतकऱ्यांच्या जोरावर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली रुजवली आणि वाढवली सुद्धा…
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित राजकारणाच्या राजकारणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यामुळे ब्रेक लागला. राजू शेट्टी हे नाव उत्पादक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून समोर आलं. शेतकऱ्यांच्या मालाला अधिक नफा मिळून देणारा नेता अशी त्यांची ओळख संपूर्ण देशभर झाली होती. उत्पादक शेतकऱ्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांना आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अगदी डोक्यावर घेतलं. राज्यातील तरुण वर्गही एकेकाळी त्यांचा फॅन झाला होता.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच आपल्याला चार पैसे जास्त येऊ लागले अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात फिट करून गेली. पण आता सध्याच्या बदलत्या राजकारणात अनेक नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. त्यामुळे एकेकाळी प्रतिस्पर्ध्यांशी पंगा घेणारे राजू शेट्टी हे स्वतःच्या संघटनेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकाकी पडल्याचे सध्या चित्र दिसतंय. त्यामुळे राजू शेट्टी यांचे नेमकं चुकतंय तरी कुठं? चळवळ आणि राजकारण यांची सांगड घालण्यात ते अपयशी कसे ठरतात? याबाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
राजू शेट्टींबद्दल बोलायचे झाले तर सर्वसामान्य घरातील साधा मेकॅनिक इंजिनियर हा थेट शेतकऱ्यांची चळवळ उभारतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना शेतकऱ्यांसाठी शिंगावर घेतो. ही वाटते तितकी साधी आणि सोप्पी गोष्ट नव्हती. तसं बघितलं तर साखर कारखाने, बँका, दूध संघ चालवणाऱ्या नेत्यांना जणू देवाचाच मान. अशा या काळात तिथून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे काही खायचं काम नव्हतं. पण राजू शेट्टीने ते करून दाखवलं होतं. खासकरून ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींनी लढा दिला.
2002 मध्ये ऊस दरावरून आंदोलन पेटलं आणि इथूनच राजू शेट्टी यांची खरी कारकीर्द सुरु झाली. साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची संघटितपणे लूट केली जाते असा राजू शेट्टींचा पाहिल्यापासूनच आरोप होता. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव मिळावा या साठी राजू शेट्टींनी अनेकदा संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको, ऊस तोडणीस बंदी, साखर कारखान्यावर बहिष्कार इत्यादी. मार्गांचा वापर केला. दुधाच्या भावावरून आंदोलने केली व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, 7/12 कोरा करणे अशा अनेक मागण्या संघटनेने उचलून धरल्या आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
याच चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी राजकारणात आले. त्यानंतर आमदार आणि खासदार झाले. रस्त्यावरच्या राजू शेट्टींचा आवाज थेट दिल्लीतील संसद भवनापर्यंत पोहोचला. आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि प्रस्थापितांना शिंगावर घेण्याच्या वृत्तीमुळे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. मात्र चळवळ आणि राजकारण यांची सांगड घालण्यात राजू शेट्टींना अपयश आले. तसेच युती करताना त्यांनी संघटनेची ताकद कमी करून घेतली. तसेच अनेकदा मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांऐवजी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उपड्या उमेदवाराला तिकीट दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला घरघर लागली.
एकीकडे उपड्या उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर तो पक्ष सोडून जातो तर दुसरीकडे मूळ कार्यकर्ता पक्षापासून दूर होताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत राजू शेट्टी यांनी निष्ठावान कार्यकर्त्याला डावलले आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आलेल्या सुजित मिणचेकर यांना उमेदवारी दिली. आता याच सुजित मिणचेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून आता राजू शेट्टींच्या माजी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मिणचेकर यांनी भगवा हातात घेतल्यानंतर राजू शेट्टींनी निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून काय मिळवलं हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
खरं तर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले वैभव कांबळी यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र राजू शेट्टी यांनी वैभव कांबळी यांना कात्रजचा घाट दाखवून ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या सुजित मिणचेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राजू शेट्टी यांना 25 वर्षे सोबत असलेल्या वैभव कांबळी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आता मिणचेकर यांनीच राजू शेट्टींना धक्का दिला आहे.
यापूर्वीचा इतिहास बघितला तर मिणचेकरचं नाहीतर याआधी भारत भालके, सुजय घाटगे, दत्ता घाटगे, मनोज घोरपडे, अमर पाटील, खासदार विशाल पाटील, प्रमोद पाटील यांसारख्या बड्या नेत्यांनीसुद्धा फक्त निवडणुकीपुरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला वापरला. पण निवडणुकीनंतर या सर्वानी शेट्टींना जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.
मध्यंतरीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुरुज असलेले सध्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार देवेंद्र भुयार, रविकांत तुपकर यांनीदेखील राजू शेट्टी यांच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघटना सोडली होती. यानंतर उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत राजू शेट्टी यांनी चळवळ टिकवण्याचा प्रयत्न केला.
मात्र संघटनेच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते हातात दगड आणि काठी घेऊन रस्त्यावर उतरले होते; त्याच कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे राजू शेट्टींवर अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. जे कार्यकर्ते सोबत आहेत त्यांचा विचार राजू शेट्टी कधीच करत नाहीत अशी चर्चा दबक्या आवाजात पक्षात सुरु असते. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मालनाईक , वैभव कांबळी, जनार्दन पाटील यांनी संघटनेला राम – राम केला तर जवळच्या कार्यकर्त्यांनी संघटना न सोडता संघटनेपासून 4 हात लांब राहण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासोबत आता कोण? असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकेकाळी ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातात दगड घेऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आणली होती अशा सत्ताधाऱ्यांकडून आता फारसे लक्ष दिले जात नाही आहे. त्यामुळे आता संघटनेकडे निष्ठावान कार्यकर्ता शोधण्याची वेळ आली आहे आणि त्याचे उत्तर आता राजू शेट्टी यांनाच द्यावे लागणार आहे.
खरं तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला, दुधाला दर मिळाला, कडधान्याला हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला. राजू शेट्टी हेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुख्य नेते बनले होते. झपाट्याने वाढत गेलेल्या शेतकरी संघटनेला अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतले होते. पण पक्षातून बडे नेते सोडून जाणे, उपऱ्यांच्या उमेदवारीमुळे मूळ कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होणे या गोष्टींमुळे राजू शेट्टी यांचे राजकारण गोत्यात आले होते.
एकीकडे राजू शेट्टी (Raju Shetti) हे राजकारणात अपयशी झाले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता ही त्यांची ओळख अजूनही कायम आहे. आजही ते कोणत्या ना कोणत्या मुद्दावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असे सगळे असले तरी आपले सहकारी आपल्याला का सोडून जात आहेत याचे उत्तर राजू शेट्टींना शोधावे लागणार आहे. त्यामुळे राजू शेट्टीना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मूठ बांधावी लागणार आहे. तरच शेतकरी संघटना टिकू शकेल आणि शेतकऱ्यांचा आवाज बनू शकेल.





