लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य का? अजित पवारांनी सांगितले कारण…

Ladki Bhain Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेअंतर्गतील अनेक फसवणूकीचे प्रकार समोर आले. त्यानंतर राज्य सरकारकडून काही निर्णय घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 2 महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ई-केवायसी का करावी, त्यामागचा हेतु काय? याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“मी आता चार-पाच जिल्ह्याचा दौरा केला, तेव्हा मी तेथील लाडक्या बहिणींना विचारल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी केलेली नसल्याचे समजले. हा पैसा सरकारचा, जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. जो लाभ लाभार्थ्यांना द्यायचा तो लाभ त्याच्याच खात्यात जावा म्हणून या सर्व गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. काही जण मयत असतात, पण त्यांची नावं कमी केलेली नसतात, असे अनेक कारणे आहेत. त्यासाठी ई-केवायसी सुरू केलेली आहे. देशात सगळीकडेच ई-केवायसी सुरू असून याबाबत नागरिकांमध्येही जागृती झाली आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?
१. लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
३. यात तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.
४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
५. आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल. Ladki Bhain Yojana |
तांत्रिक अडचणींचा सामना
दरम्यान, योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असली तरी अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली वेबसाइट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहेत. ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Ladki Bhain Yojana |
हेही वाचा:





