भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का? उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना थेट सवाल

नागपूर – ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, रविवारी (29 सप्टेंबर) नागपुरातील रामटेकच्या कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. तसेच भाजपाचे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? असा थेट सवाल त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला.
उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, ज्याला मी बाजारबुनगा म्हटले ते आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात येऊन गेले. त्यानंतर थोड्याच दिवसांत माझा नेमका पुण्यात कार्यक्रम झाला. ते मला तिथे म्हणाले होते की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे संस्थापक आहेत. मी औरंगजेब फॅनक्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अब्दाली आहात, अहमद शाह अब्दाली.
यानंतर ते चार दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. बंददाराआड चर्चा केली की, उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना संपवा. त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बुथ लेव्हलचे कार्यकर्ते फोडा. पण अमित शाह हे बंद दाराआडचे धंदे सोडा आणि हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा? असे आवाहन त्यांनी अमित शहांना दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही 25 ते 30 वर्षे हिंदुत्वच्या मुद्द्यावरून सोबत राहिलो. मग 2014 मध्ये दिल्लीत तुमचा पंतप्रधान बसल्यावर काय झालं होतं? विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अंतिम टप्प्यात जागावाटप आलं होतं. दोन-पाच जागा इकडेतिकडे राहिल्या होत्या. पण एकनाथ खडसेंचा फोन आला की, उद्धव ठाकरे आता बस झाले. आम्हाला नाही वाटत की, आता युती पुढे टिकावी.
मी त्यांना विचारले, काय झाले? दोन-चार जागांचा प्रश्न संपवून टाकू. तर खडसे म्हणाले की, नाही नाही बस मला वरून सांगण्यात आले आहे की, आता आपली युती तुटली. 15 दिवसांत युती तुटली आणि आमच्या 63 जागा निवडून आल्या. त्यानंतर त्यांना समजलं की, महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर कोथळा बाहेर येतो, असा घणाघात ठाकरेंनी केला.





