Irshalwadi : “अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार’ – अजित पवार

मुंबई – रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत तथापि, खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद सभागृहात निवेदनाद्वारे दिली.
अजित पवार म्हणाले की, इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापूर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे आशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या.
खालापूर तालुक्यात दि. 17 जुलै दि. 19 जुलै 2023 या तीन दिवसांत एकुण 499 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
तसेच श्वान पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहोचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरते नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री





