Lorcan Tucker Stumping : आऊट असूनही नॉट आऊट! लॉर्कन टकरला नियमाने वाचवलं; यष्टीरक्षकाची ‘ती’ गडबड ओमानला पडली महागात
Lorcan Tucker Stumping : कर्णधार लॉर्कन टकरला यष्टीरक्षकाने यष्टीचीत (Stumping) केले, पण तांत्रिक नियमामुळे पंचांनी त्याला नाबाद घोषित केले.

Lorcan Tucker stumping survival ICC rule : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आयर्लंड आणि ओमान यांच्यातील सामन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि गोंधळात टाकणारी घटना पाहायला मिळाली. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर आयर्लंडची फलंदाजी सुरू असताना, कर्णधार लॉर्कन टकरला यष्टीरक्षकाने यष्टीचीत (Stumping) केले, पण तांत्रिक नियमामुळे पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यष्टीरक्षकाची ‘ती’ एक चूक नडली!
सामन्याच्या ८ व्या षटकात ओमानचा फिरकीपटू आमिर कलीम गोलंदाजी करत होता. पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकर मोठा फटका मारण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला, पण तो चेंडू हुकला. ओमानचा यष्टीरक्षक विनायक शुक्लाने चपळाईने चेंडू पकडला आणि बेल्स उडवल्या. टकर क्रीजच्या खूप बाहेर असल्याने तो स्पष्टपणे आऊट दिसत होता.
मात्र, पंचांनी हा निर्णय ‘थर्ड अंपायर’कडे सोपवला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की, चेंडू विनायक शुक्लाच्या डाव्या हातात होता. मात्र, त्याने बेल्स उडवण्यासाठी उजव्या हाताचा वापर केला होता. आयसीसीच्या नियमानुसार, ज्या हातात चेंडू आहे त्याच हाताने किंवा चेंडू दोन्ही हातांच्या संपर्कात असताना बेल्स उडवणे अनिवार्य आहे. रिकाम्या हाताने बेल्स उडवणे ही कायदेशीर स्टंपिंग मानली जात नाही. यामुळे टकरला जीवदान मिळाले.
नवाझ-कोनोली वादाची आठवण झाली –
अशीच एक घटना याच महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेत घडली होती. तिथे मोहम्मद नवाझच्या चेंडूवर कूपर कोनोलीला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आले होते. तिथल्या यष्टीरक्षकानेही दुसऱ्या हाताने बेल्स उडवल्या होत्या, पण त्यावेळी पंचांकडून चूक झाली होती. मात्र, विश्वचषकाच्या या महत्त्वाच्या सामन्यात पंचांनी सतर्कता दाखवत अचूक निर्णय दिला.
टकरचा धमाका आणि ओमानचे टेन्शन –
या जीवदानाचा फायदा घेत लॉर्कन टकरने तुफानी फलंदाजी केली आणि ९४ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. जर त्या वेळी तो बाद झाला असता, तर कदाचित आयर्लंडला २३५ धावांचा डोंगर उभा करता आला नसता. ओमानच्या यष्टीरक्षकाची ती छोटी तांत्रिक चूक त्यांच्यासाठी खूप महागडी ठरली. ज्यामुळे त्यांना सामना ९६ धावांनी गमवावा लागला.






