इराणनंतर इराकमध्ये हवाई हल्ला ; लष्करी तळावर मोठा स्फोट, इस्रायलवर हल्ल्याचा संशय

Iraq Military Base Attack । जगात एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहे. हे सगळं सुरु असताना आता इराकवर हवाई हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. इराकच्या ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स’ (पीएमएफ) ने याविषयी माहिती दिली.
पीएमएफने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी रात्री त्यांच्या कलसो मिलिटरी बेसच्या कमांड पोस्टवर मोठा स्फोट झाला. कलसो मिलिटरी बेस बगदादपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटामागील हवाई हल्ला असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले आहे. या हल्ल्यात एका पीएमएफ सैनिकाचा मृत्यू झाला, तर सहा सैनिक जखमी झालेत, ज्यांना हिला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
एका वृत्तसंस्थेनुसार, पीएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की, “स्फोटामुळे तळावरील वस्तूंचे नुकसान झाले आहे. काही लोक जखमीही झाले आहेत.” एक पथक या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पुढे म्हटले आहे. सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे की हवाई हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. एका अमेरिकन अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, इराकमध्ये कोणतीही अमेरिकन लष्करी कारवाई झालेली नाही.
इस्रायलवर हल्ला झाल्याचा संशय Iraq Military Base Attack ।
इस्रायलने शुक्रवारी इराणवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराणने केलेल्या ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. यामुळेच आता इराकमधील लष्करी तळावरील हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे बोलले जात आहे. इराक इराणच्या अगदी जवळ आहे. त्याशिवाय, पीएमएफचे इराणी लष्कराशी घनिष्ठ संबंध आहेत, जे सूचित करते की इस्रायलने संदेश पाठवण्यासाठी हा हल्ला केला असावा.
पीएमएफ इराणच्या जवळ Iraq Military Base Attack ।
PMF ची सुरुवात 2014 मध्ये मिलिशियाचा एक भिन्न गट म्हणून झाली, ज्यापैकी बहुतेक इराणच्या जवळ होते. इराकच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नंतर त्यांना औपचारिकपणे सुरक्षा दल म्हणून मान्यता दिली. इराकमध्ये इस्लामिक स्टेटशी लढण्यातही पीएमएफने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पीएमएफमध्ये समाविष्ट असलेल्या गटांनी अनेक महिन्यांपासून इराकमधील अमेरिकन सैन्यावर रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले होते, परंतु फेब्रुवारीपासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.





