Iran USA Conflict – इराण-अमेरिकेतील युद्धाचा फटका पिंपरी-चिंचवड विद्यार्थ्यांच्या एका गटाला बसला आहे. वाकड येथील इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेसमधील एमबीए प्रथम वर्षाचे ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्यामुळे विमानतळाचे नुकसान झाले असून विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कॉलेजकडून विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असून ते सुरक्षित आहे. दुबईतील विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्यांना भारतात आणले जाणार आहे. इंदिरा युनिव्हर्सिटी ऑफ स्कूल ऑफ बिझनेसचे ८४ विद्यार्थी २३ फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून युनिव्हर्सिटीकडून एमबीए विद्यार्थ्यांना दुबईमध्ये ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्रामसाठी पाठविले जाते. या वर्षी एकूण १ हजार ८० विद्यार्थी हा प्रोग्राम करणार असून आतापर्यंत ६०० विद्यार्थी हा प्रोग्राम करून परत आले. ८४ विद्यार्थ्यांची एक तुकडी सध्या दुबईत अडकली आहे. शनिवारी इराणने दुबईवर हल्ला केल्याने त्यांचे परतीचे विमान रद्द झाले. इराणच्या हल्ल्यामुळे दुबईतील स्थिती चिघळली आहे. विमानतळाचे नुकसान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवस ही विमान सेवा सुरु होण्याची शक्यता नाही. विद्यार्थांना सुरक्षित ठिकाणी ठेवले असून विमानसेवा सुरु होताच त्यांना मायदेशी आणले जाणार असल्याचे इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेसकडून सांगण्यात आले. ५५ मुले , २९ मुली दुबईमध्ये अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांपैकी ५५ मुले तर २९ मुली आहेत. हे सर्व विद्यार्थी दुबईतील एका हॉटेलमध्ये आहे. हे विद्यार्थी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबियांशी तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी संवाद साधत आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आपण सुरक्षित असल्याचे व्हिडिओ काढून पाठवत आहेत. स्वतंत्र विमानाची तयारी इराणच्या हल्ल्यामुळे दुबईच्या विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आसपासच्या शहरांमधील विमानतळावरून जरी उड्डाणे सुरु झाली तरी तेथून विद्यार्थ्यांना आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच गरज पडल्यास स्पेशल विमान करून विद्यार्थ्यांना भारतात आणले जाईल. सध्या सर्व विद्यार्थी दुबईतील भारताच्या दुतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. “ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्रामसाठी कॉलेजचे ८४ विद्यार्थी दुबईला गेले होते. ते शनिवारी पुन्हा भारतात येणार होते. मात्र, युद्धजन्य स्थितीमुळे विमानसेवा ठप्प झाल्याने ते दुबईत अडकले आहेत. विद्यार्थी सुरक्षीत आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न आहे.” – चेतन वाकलकर, सीएमओ तथा शैक्षणिक सल्लागार, इंदिरा युनिव्हर्सिटी “आम्ही हॉटेलमध्ये असून सुरक्षित आहोत. आमचा सर्व खर्च कॉलेज करत आहे. आम्हाला खात्री आहे की कॉलेज आम्हाला येथून सुरक्षित भारतात नेईल. जय महाराष्ट्र.” – दुबईतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ संदेश