Iran US War: इराणने ट्रम्पसह जगाला भरवली धडकी ; गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटासहा १८ अमेरिकी कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी
Iran US War: इराणने अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या दिलेल्या धमक्यांना अमेरिकेने प्रत्युत्तर दिले आहे.

Iran US War: इराणने अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या दिलेल्या धमक्यांना अमेरिकेने प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) दिलेल्या इशाऱ्याला प्रतिसाद म्हणून व्हाईट हाऊसने हे निवेदन जारी केले आहे.
निवेदनात इराणने दिलेल्या धमकीचा उल्लेख करण्यात आलाय. त्यात,” जर आणखी इराणी नेत्यांची हत्या झाली, तर ते गूगल आणि मायक्रोसॉफ्टसह अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करतील” असे इराणने म्हटले असल्याचे सांगण्यात येतंय.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “अमेरिकन सैन्य कोणत्याही इराणी हल्ल्याला रोखण्यासाठी सज्ज आहे आणि यापुढेही राहील. इराणी राजवटीकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये झालेली ९०% घट हे स्पष्टपणे दर्शवते.” असे म्हणत इराणच्या धमकीला उत्तर दिले आहे.
टेक कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा
युद्धादरम्यान इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. आता, ते अमेरिकन टेक कंपन्यांनाही लक्ष्य करण्याची तयारी करत आहे. काल इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) गूगल आणि मायक्रोसॉफ्टसह १८ अमेरिकन कंपन्यांवर हल्ले करण्याचा इशारा दिला. इराणच्या या धमकीमुळे आता कॉर्पोरेट कंपन्या असुरक्षित झाल्या आहेत.
IRGC ने आपल्या निवेदनात, “इराणमधील प्रत्येक हत्येच्या बदल्यात, ते या टेक कंपन्यांची संबंधित युनिट्स नष्ट करतील”, अशी धमकी देण्यात आलीय. अधिकाऱ्यांच्या हत्यांमध्ये कथितरित्या सामील असलेल्या १८ अमेरिकन कंपन्यांच्या नावांचा त्यात समावेश होता.
आयआरजीसीने या टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, जर त्यांना आपले प्राण वाचवायचे असतील तर तात्काळ आपली कामाची ठिकाणे सोडण्याचा सल्लाही दिला आहे.
ॲपल आणि गुगलसह १८ कंपन्यांना लक्ष्य Iran US War:
आयआरजीसीने आखाती देशांमधील १८ अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. या कंपन्यांमध्ये सिस्को, एचपी, इंटेल, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल, मेटा, आयबीएम, डेल, पॅलंटिर, एनव्हिडिया, जेपी मॉर्गन, टेस्ला, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्युशन्स, जी४२ आणि बोईंग यांचा समावेश आहे.
इराणच्या मते, या कंपन्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांना पाठिंबा देतात. इराणने आपल्या सायबर हल्ल्यांसाठी या कंपन्यांना जबाबदार धरले आहे.






