US-Iran War Updates: इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि त्यांच्या पारंपरिक सहयोगी देशांमधील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मंगळवारी ‘ट्रुथ सोशल’वरून ब्रिटन आणि फ्रान्सवर थेट टीका करत कठोर शब्दांत इशारा दिला. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हार्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जेट इंधनाच्या तुटवड्याला सामोरे जाणाऱ्या देशांनी विशेषतः ब्रिटनसारख्या देशांनी अमेरिकेच्या इराणविरोधी मोहिमेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अशा देशांसाठी त्यांनी दोन पर्याय सुचवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे, अमेरिकेकडून तेल खरेदी करणे, कारण अमेरिकेकडे पुरेशा प्रमाणात तेलसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरा पर्याय म्हणजे स्वतः धैर्य दाखवून हार्मुज सामुद्रधुनीत जाऊन तेल मिळवणे. “आता तुम्हाला स्वतः लढायला शिकावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला. अमेरिका तुमच्या मदतीला येणार नाही – ट्रम्प ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, “जसे तुम्ही आमच्या मदतीला आला नाहीत, तसे आता अमेरिका तुमच्या मदतीला येणार नाही.” त्यांनी इराणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित देशांना स्वतःची ऊर्जा गरज भागवण्याचे आवाहन केले. या वक्तव्यामुळे अमेरिका आणि त्याच्या नाटो सहयोगींमधील दरी अधिकच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी इतक्या थेट आणि कठोर भाषेत अमेरिकेने ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांवर टीका केल्याचे क्वचितच पाहायला मिळाले आहे. दरम्यान, युरोपातील अनेक देशांनी अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे. इटलीने तर आपल्या सिगोनेला एअरबेसचा वापर करण्यासही नकार दिला होता. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेट इंधनाचा तुटवडा – हार्मुज सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहतूक होते. सध्या हा मार्ग जवळपास बंद असल्यामुळे युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये जेट इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या आणि शुद्ध केलेल्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून पर्यायी पुरवठ्यासाठी विविध देश धडपड करत आहेत. ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांवर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या सर्व घडामोडींमुळे पाश्चिमात्य देशांमधील दीर्घकाळ टिकलेली एकजूट ढासळताना दिसत आहे. एकीकडे अमेरिका स्वतंत्रपणे कारवाई करत असून सहयोगी देशांवर नाराजी व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे युरोपियन देश या युद्धाला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात मानत त्यात सहभागी होण्यास नकार देत आहेत. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात मोठ्या बदलांची चिन्हे दिसत असून, अमेरिका-युरोप संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.