Strait of Hormuz : इराण होर्मूझची सामुद्रधुनी उघडणार; अमेरिकेच्या देखरेखीखाली तेलविक्रीही करणार
मात्र होर्मूझची सामुद्रधुनी खुली होणार असल्याने जागतिक अर्थकारणाला सहाय्य होणार आहे. ही गोष्ट जागतिक पातळीवर दिलासादायक असणार आहे.

Strait of Hormuz – अमेरिकेबरोबरच्या युद्धबंदी करारानुसार इराण होर्मूझची सामुद्रधुनी खुली करणार आहे. तसेच अमेरिकेच्या देखरेखीखाली आपल्या तेलाची विक्री देखील करणार आहे, अशी माहिती मिळते आहे.
हंगामी युद्धबंदी करारातील काही भाग उघड झाला असून या कराराशी संबंधित अधिकाऱ्यांनी या तपशीलाला दुजोरा दिला आहे. या करारावर अधिकृतपणे जिनिव्हा येथे शुक्रवारी दोन्ही बाजूंकडून स्वाक्षरी होणे बाकी आहे.
जर इराणने अणू कार्यक्रमाबाबतच्या अटींचे पालन केले, तर फेरउभारणीसाठी अमेरिका इराणला ३०० अब्ज डॉलर देणार आहे. तसेच अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध हटवले जाणार आहेत. तसेच लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिज्बुल्लाहमधील संघर्ष तात्काळ थांबवण्याची मागणीही या करारानुसार केली जाणार आहे.
मात्र या प्रस्तावित करारावर अमेरिकेतून आणि इस्रायलकडूनही मोठ्या प्रमाणावर टीका होण्याची शक्यता आहे. इराणला अमेरिकेकडून आर्थिक मदत दिली जाणे, अमेरिकेतील संसद सदस्यांकडून मान्य होणे शक्य नाही. तसेच हिज्बुल्लाहविरोधातली कारवाई थांबवायला लागणार असल्याने इस्रायलही नाराज आहे.
निर्बंध हटवणे, गोठवलेला निधी परत मिळणे, तेलविक्रीला परवानगी मिळणे आणि अणू कार्यक्रमाबाबतचा निर्णय वाटाघाटींवर अवलंबून असेल. तसेच युद्धापुर्वीची स्थिती पुन्हा प्राप्त होणार असल्याने हा करार इराणच्याच फायद्याचा असेल, असे म्हटले जाते आहे.
मात्र होर्मूझची सामुद्रधुनी खुली होणार असल्याने जागतिक अर्थकारणाला सहाय्य होणार आहे. ही गोष्ट जागतिक पातळीवर दिलासादायक असणार आहे.





