Iran vs Israel War : इराण-इस्रायल युद्धाने ICC चं टेन्शन वाढलं! दुबई कनेक्शनमुळे टी-२० विश्वचषकातील गणितं बिघडली
Iran vs Israel War : या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा थेट फटका विमान प्रवासाला आणि आयसीसीच्या तिजोरीला बसण्याची शक्यता आहे.

ICC Loss Iran vs Israel War : सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार भारत आणि श्रीलंकेत सुरू असतानाच, मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटले आहे. जरी या युद्धाचा खेळाडूंवर भारतात थेट परिणाम होत नसला तरी, स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा थेट फटका विमान प्रवासाला आणि आयसीसीच्या तिजोरीला बसण्याची शक्यता आहे.
हवाई मार्ग बंद झाल्याने प्रवासाचा पेच –
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील सुरक्षा धोक्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली असून विमान उड्डाणे रद्द केली आहेत. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांसारखे क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना दुबईमार्गे प्रवास करणे सोयीचे मानतात. मात्र, इराणच्या हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता स्पर्धा संपल्यानंतर किंवा बाद झालेल्या संघांना मायदेशी परतणे कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचा भारतात राहण्याचा, खाण्यापिण्याचा आणि सुरक्षेचा अतिरिक्त खर्च आयसीसीला करावा लागणार आहे.
आयसीसीला ‘असा’ सोसावा लागेल आर्थिक फटका –

इराण-इस्रायल युद्धामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान आयसीसीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार
दुबईमध्ये आयसीसीचे मुख्य कार्यालय आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे तेथील अनेक कर्मचारी आणि अधिकारी प्रवासाअभावी अडकून पडण्याची शक्यता आहे.
- लॉजिस्टिक्स खर्च: खेळाडूंच्या प्रवासाचे मार्ग बदलणे किंवा चार्टर्ड विमानांची व्यवस्था केल्यास खर्चात मोठी वाढ होईल.
- कर्मचारी व्यवस्थापन: दुबईतील ऑफिसमधील कामकाज आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर होणारा खर्च आयसीसीला सोसावा लागेल.
- ब्रॉडकास्टिंग आणि कनेक्टिव्हिटी: तांत्रिक साहित्य आणि क्रू मेंबर्सच्या प्रवासात अडथळे आल्यास प्रसारणावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे आयसीसीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतात खेळाडू सुरक्षित –
South Africa extend their unbeaten run in the 2026 #T20WorldCup with a comfortable victory over Zimbabwe 👏
📝: https://t.co/TFO4Y1Unna pic.twitter.com/qfxXFYQhmA
— ICC (@ICC) March 1, 2026
टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असल्याने मैदानावरील खेळाडूंना सध्या कोणताही धोका नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात खेळाडूंच्या घरवापसीसाठी आयसीसीला मोठी कसरत करावी लागणार आहे.





