Iran-Israel war: शेकडो इराणी नागरिकांचे तुर्कीकडे स्थलांतर; सीमेवर निर्वासितांच्या रांगा
Iran-Israel war: दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिकांनी तुर्कीकडे धाव घेतल्याने येत्या काळात निर्वासितांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Iran-Israel war: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पुकारलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर आता सामान्य नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारी इराणमधील शेकडो नागरिकांनी तुर्कीची सीमा ओलांडून आश्रय घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमधील बॉम्बस्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून इंधनासाठी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
भीतीचे सावट: ‘प्रत्येकजण घरात लपून’- (Iran-Israel war)
तुर्कीच्या कापिकोय सीमा नाक्यावर पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी इराणमधील भयावह परिस्थितीचे वर्णन केले.
हेही वाचा: इराण-इस्रायल युद्धामुळे संकट; नैसर्गिक वायूच्या दरात 50% तर कच्च्या तेलात 10% वाढ
तेहरानमधील स्थिती: राजधानी तेहरानमधून आलेल्या एका नागरिकाने सांगितले की, “शहरात सातत्याने बॉम्बस्फोटांचे आवाज येत आहेत. परिस्थिती अत्यंत कठीण झाली असून सर्वसामान्य जनता घाबरलेली आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती.”
Iran-Israel war
लष्करी तळांवर हल्ले: कझविन भागातून आलेल्या बिनाली किलीच या नागरिकाने सांगितले की, “नागरी भागात जीवन सामान्य दिसण्याचा प्रयत्न होत असला तरी, जवळच असलेल्या लष्करी तळांवर सतत बॉम्बफेक होत आहे. भीतीने लोक स्वतःला घरांत कोंडून घेत आहेत.”
इंधनाचे संकट –
इराणमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नसला तरी, इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पेट्रोल-डिझेल मिळवणे कठीण झाले असून, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
तुर्की प्रशासनाची भूमिका –
सुरुवातीला तुर्कीने आपल्या तीन सीमा नाक्यांवरून होणारी सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक स्थगित केली होती. केवळ तुर्की नागरिक आणि इतर देशांच्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र, सोमवारी दुपारनंतर इराणी नागरिकांना प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली.
व्यापारी वाहतूक सुरू: तुर्कीचे व्यापार मंत्री ओमेर बोलाट यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील व्यावसायिक मालवाहतूक नियंत्रित अटींनुसार सुरू आहे.
हाय अलर्ट: तुर्कीने आपल्या सीमा सुरक्षा दलाला ‘हाय अलर्ट’वर ठेवले असून व्यापार आणि नागरिकांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिकांनी तुर्कीकडे धाव घेतल्याने येत्या काळात निर्वासितांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





