Oil and gas prices jump: मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. इराणने अमेरिकन आणि इस्रायली तळांवर केलेल्या प्रतिहल्ल्यांनंतर जागतिक बाजारात इंधन दरांचा भडका उडाला असून नैसर्गिक वायूच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. इंधन बाजारात खळबळ: कतार आणि सौदीला फटका – जगातील सर्वात मोठा वायू निर्यातदार असलेल्या ‘कतार एनर्जी’ने (QatarEnergy) आपल्या प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर उत्पादन तात्पुरते बंद केले आहे. इराणकडून रास लफान इंडस्ट्रियल सिटी आणि मेसाईद येथील वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याचे कतारच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियातील ‘अरामको’नेही रास तनुरा येथील आपली मुख्य तेल रिफायनरी ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून बंद केली आहे. हेही वाचा – ‘आमचं लष्करी तळ वापरायचं नाही’; इराणवरील हल्ल्यासाठी स्पेनचा अमेरिकेला नकार, 15 विमाने परत पाठवली महत्त्वाच्या घडामोडी: कच्चे तेल (Brent Crude): जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वधारून ८२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. होरमुझची सामुद्रधुनी: जगातील २०% तेल आणि वायूची वाहतूक होणाऱ्या या महत्त्वाच्या जलमार्गावरून प्रवास न करण्याचा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक ठप्प झाली असून १५० हून अधिक टँकर्सनी वाहतूक थांबवली आहे. सोन्याची झळाळी: अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या दरात २ टक्क्यांची वाढ होऊन ते ५,३८८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. जागतिक शेअर बाजारात ‘लाल निशाण’ – युद्धाच्या सावटाखाली जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील Dow Jones, Nasdaq आणि S&P 500 हे तिन्ही निर्देशांक घसरणीसह उघडले. लंडनचा FTSE 100 १ टक्क्याने घसरला. हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे ‘ब्रिटीश एअरवेज’च्या समभागात मोठी पडझड झाली. बार्कलेज आणि एचएसबीसी (HSBC) सारख्या बँकांच्या शेअर्समध्येही घट झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची आणि व्याजदरात कपात न होण्याची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. महागाईचा भडका उडण्याची शक्यता – तज्ज्ञांच्या मते, जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पार जाऊ शकतात. साबिथा सुब्रमण्यम (मुख्य अर्थतज्ज्ञ, सरासिन अँड पार्टनर्स) यांच्या मते, “तेलाचे दर उच्च स्तरावर राहिल्यास त्याचा परिणाम अन्नधान्य, शेती आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमतींवर होईल, ज्यामुळे जागतिक महागाई पुन्हा वाढू शकते.” वाहतूक मार्ग बदलला – इराणच्या धमक्यांमुळे डॅनिश शिपिंग कंपनी ‘मर्स’ (Maersk) ने सुएझ कालव्याऐवजी आपली जहाजे ‘केप ऑफ गुड होप’मार्गे (दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून) नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढणार आहे.