Iran–Israel war : इराणमधून ३ हजार ४२६ भारतीयांना आणले परत

Iran–Israel war – इराण आणि इस्त्रायलमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवले. त्या विशेष मोहिमेच्या माध्यमातून इराणमधून ३ हजार ४२६, तर इस्त्रायलमधून ८१८ भारतीय परतले.
इस्त्रायल आणि इराणमध्ये सुमारे १० दिवस जोरदार संघर्ष झाला. त्यामुळे दोन्ही देशांत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना त्या देशांतून परत आणण्याचे पाऊल उचलले.
त्यासाठी १८ जूनपासून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आले. त्या मोहिमेविषयीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरूवारी पत्रकारांना दिली.
संघर्षावेळी इराणमध्ये सुमारे १० हजार, तर इस्त्रायलमध्ये जवळपास ४० हजार भारतीय राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाला अखेर विराम मिळाला.
त्यामुळे ऑपरेशन सिंधू थांबवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आम्ही स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. त्या स्थितीचा विचार करून ऑपरेशन चालू ठेवायचे की नाही याविषयीचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यातून तूर्त तरी भारताने ऑपरेशन समाप्त केले नसल्याचे सूचित झाले.





