Jammu Kashmir News : बारामूलात दहशतवाद्याला अटक; कुलगाममध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहीम तीव्र केली आहे.

Jammu Kashmir News – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना बारामूला जिल्ह्यात मोठे यश मिळाले असून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
शनिवारी बारामूला जिल्ह्यातील शेरी परिसरातील फथागड भागात भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा शोध घेऊन तो तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून हिझबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनांचे पोस्टर्स, औषधे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शुक्रवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन कामगारांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांनी आपला शोध आणि तपास मोहीम अधिक तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क मोडवर आहेत.





