Iran-Israel USA War: इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाची तातडीची सूचना; काही तास घरातच राहण्याचा सल्ला
Iran-Israel USA War: भारतीय दूतावासाने इराणमधील सर्व भारतीयांना जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Iran-Israel USA War: इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांसाठी तातडीची अॅडव्हायजरी जारी केली आहे. पुढील ४८ तास घराबाहेर न पडण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला मंगळवारी रात्रीपर्यंत समझोता करण्याची मुदत दिली असून ती संपत आहे. या डेडलाइननंतर “एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते” अशी गंभीर धमकीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे.
दूतावासाच्या महत्त्वाच्या सूचना –
भारतीय दूतावासाने इराणमधील सर्व भारतीयांना जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पॉवर प्लांट आणि महत्त्वाच्या ठिकाणांपासून दूर राहा: वीज प्रकल्प, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन्स, लष्करी तळ आणि सरकारी इमारती यांच्या परिसरात जाऊ नये. हे संभाव्य लक्ष्य ठरू शकतात.
वरच्या मजल्यांवर राहणे टाळा: बहुमजली इमारतींमधील वरच्या मजल्यांऐवजी खालच्या मजल्यांवर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हायवे प्रवासावर निर्बंध: अत्यावश्यक परिस्थितीतच बाहेर पडावे. हायवेवर जाण्यापूर्वी दूतावासाशी संपर्क साधणे बंधनकारक आहे.
हॉटेलमध्ये राहणाऱ्यांसाठी सूचना: दूतावासाने व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये राहणाऱ्यांनी हॉटेलमध्येच थांबावे आणि दूतावासाच्या संपर्कात राहावे.
ट्रंप यांची कठोर भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये “आजची रात्र जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची ठरू शकते” असे म्हटले आहे. त्यांनी इराणवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त करत “आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होऊ शकते” असेही विधान केले.
इराणची प्रतिक्रिया –
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबतचे सर्व संवादमार्ग तात्पुरते स्थगित केले आहेत. दरम्यान, मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी दूतावासाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





