War Updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते,” असा अत्यंत कठोर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, “आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल, जी पुन्हा कधीही उभी राहणार नाही. मला ते घडू नये असे वाटते, पण तसे होण्याची शक्यता आहे.” तसेच त्यांनी अंतिम निर्णय अद्याप राखून ठेवला असून परिस्थितीनुसार शेवटच्या क्षणी कारवाई रद्दही केली जाऊ शकते, असेही स्पष्ट केले. “आजची रात्र जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक ठरू शकते,” असे त्यांनी म्हटले आहे. हेही वाचा – Opinion Polls 2026: आसामध्ये BJP आघाडीवर, बंगालमध्ये चुरशीची लढत; केरळ-तमिळनाडूत रंजक चित्र इराणमध्ये ‘संपूर्ण सत्तांतर’ (Regime Change) होण्याची शक्यता व्यक्त करत, “अधिक शहाणे आणि कमी कट्टर नेतृत्व आल्यास काहीतरी सकारात्मक घडू शकते,” असेही ट्रम्प म्हणाले. “गेल्या ४७ वर्षांतील भ्रष्टाचार, अत्याचार आणि मृत्यूचा काळ आता संपेल,” असेही त्यांनी नमूद केले. सामुद्रधुनी खुली करा – हा इशारा होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या सामुद्रधुनीशी संबंधित आहे. इराणने ही सामुद्रधुनी खुली ठेवावी, अन्यथा कठोर लष्करी कारवाई होऊ शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे एक-तृतीयांश वाहतूक या मार्गाने होते, त्यामुळे त्याचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यानंतर हा कालावधी अनेकदा वाढवण्यात आला. पहिल्यांदा ५ दिवस, नंतर आणखी १० दिवस अशी मुदतवाढ देण्यात आली. सध्याची अंतिम मुदत ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून एकूण कालावधी ४०८ तासांपर्यंत गेला. ही मुदत आज रात्री संपत आहे. या वारंवार मुदतवाढींमुळे अमेरिकेची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, कठोर वक्तव्ये आणि मुदतवाढ यामागे कूटनीतिक डावपेच असू शकतात. सध्याच्या घडीला अमेरिकेकडून पुढील निर्णयाबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे इराणने मुदतीत निर्णय घेतला नाही, तर प्रत्यक्ष लष्करी कारवाई होणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.