Israel US Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची (Ceasefire) घोषणा झाली असली तरी, मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याऐवजी पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी सकाळी युद्धबंदी लागू होऊनही इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच असल्याने इराण संतप्त झाला आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मध्ये एक तेल टँकर रोखून धरला आहे. इराणचा सीजफायर तोडण्याचा इशारा – इराणच्या ‘तसनीम न्यूज एजन्सी’ने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधील इस्रायली हल्ले न थांबल्यास इराण युद्धबंदी करारातून बाहेर पडू शकतो. इराणने स्पष्ट केले आहे की, हा टँकर रोखणे ही इस्रायलच्या कारवायांना दिलेली थेट चपराक आहे. या घडामोडीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. हेही वाचा – शेअर बाजारात पैशांचा पाऊस; सेन्सेक्स 2,946 अंकांनी उसळला, गुंतवणूकदारांना 16 लाख कोटींचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा: इराणमध्ये ‘सत्तापालट’ – दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून एक खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणमध्ये आता ‘यशस्वी सत्तापालट’ (Regime Change) झाला आहे. इराण आता युरेनियम संवर्धन (Uranium Enrichment) पूर्णपणे बंद करेल. अमेरिका आणि इराण आता एकत्र काम करतील. जमिनीच्या आत खोलवर असलेले आण्विक साहित्य (Nuclear Material) बाहेर काढण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करतील. ज्या परमाणू केंद्रांवर अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सनी हल्ले केले होते, त्यावर सॅटेलाईटद्वारे कडक पाळत ठेवली जात आहे. जागतिक कूटनीतीला वेग: चीन आणि पाकिस्तानची भूमिका – वाढता तणाव पाहून जागतिक शक्तींनी शांततेचे आवाहन केले आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, चीन मध्यपूर्वेतील स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी आणि युद्धबंदी टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सर्व बाजूंनी संयम राखावा आणि दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचा आदर करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, एकीकडे शांततेसाठी कूटनीतिक प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्षातील लष्करी कारवाया आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील इराणची आक्रमकता यामुळे हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.