मुंबई – आयपीएल स्पर्धेत कायमच चर्चेत असलेल्या स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांची नजर असते. यंदाच्या स्पर्धेत मात्र यातीलच काही स्टार्स खेळताना दिसणार नाहीत. अपघातात जायबंदी झालेला ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, जॉनी बेअरस्टो, केल जेमिसन यांच्यासह असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी आयपीएल स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केली आहे.
येत्या शुक्रवारपासून युरू होत असलेल्या या स्पर्धेत या खेळाडूंसह विल जॅक्स, प्रसिद्ध कृष्णा, जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लॉकी फर्ग्युसन, मुकेश चौधरी हे दुखापतीतून बाहेर आले असले तरी त्यांच्याही सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यातील बहुतांशी खेळाडू रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी), दिल्ली कॅपिटल्स (डीसी) व चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्याकडून खेळतात, त्यामुळे याच संघांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
अशाच दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे यंदाच्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्स या संघांना त्यांचे कर्णधार बदलावे लागले आहेत. पंतच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आहे.
त्याचबरोबर कोलकाताने श्रेयसच्या जागी नितीश राणाला कर्णधारपदी नियुक्त केले आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पूर्ण तंदुरुस्त ठरल्याने मुंबई इंडियन्सला दिलासा मिळाला आहे.