#IPL2021 | रिकी पॉंटिंगचे पंचांशी गैरवर्तन

दुबई – निर्णायक षटकातील नो बॉल ठरू शकणारा चेंडू वाइड ठरवला गेल्याने दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंग चांगलाच संतापला व त्याने थेट मैदानात धाव घेत पंचांशी वादही घातला.
पंच निर्णय देताना चुकले असले तरीही पॉंटिंगच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही, अशा शब्दात पॉंटिंगवर सोशल मीडियावर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच काही माजी क्रिकेटपटू व समालोचकांनी हा चेंडू नो बॉलच द्यायला हवा होता, असे सांगतानाच पॉंटिंगच्या गैरवर्तनावरही कारवाई केली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीला जिंकण्यासाठी सहा चेंडूंत सहा धावांची गरज होती. ड्वेन ब्राव्होच्या या षटकातील दुसरा चेंडू यष्टीच्या खूपच बाहेर गेला. धोनीलाही हा चेंडू पकडता आला नाही आणि त्यावेळी पंचांनी हा चेंडू वाईड ठरवला. त्यावर शेमरॉन हेटमायर आणि अक्सर पटेल यांनी एक धाव घेतली, पण त्यानंतर पॉंटिंग संतापला.
त्याने थेट पंचांकडे धाव घेत त्यांच्याशी वादही घातला. हा चेंडू वाइड नसून नो बॉल द्यायला हवा होता. जर हा चेंडू नो बॉल ठरवला गेला असता तर त्यावर फ्री हीट मिळाली असती व दिल्लीसाठी ते आणखी लाभदायक ठरले असते, असा युक्तिवाद त्याने पंचांशी केला.
मात्र, ते करत असताना त्याने घातलेला वाद आता मूळ निर्णयापेक्षा जास्त वादग्रस्त ठरला. आता आयपीएल समिती यावर काय प्रतिक्रिया देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.





